अखेर सुधाकर घारे यांची पोलिसांकडून सुटका! महा एल्गार आंदोलनाला तात्पुरती स्थगिती; मुख्यमंत्र्यांकडून दोन-तीन दिवसांचा वेळ

खालापूर : भुषण प्रधान
कर्जत-खालापूर परिसरातील स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापले आहे. गोदरेज आणि टाटा स्टील कंपनीच्या प्रवेशद्वारावर ३ सप्टेंबर रोजी नियोजित करण्यात आलेल्या महा एल्गार आंदोलनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले.
स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य मिळावे, स्थानिकांना ठेकेदारीमध्ये संधी मिळावी आणि कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा निघावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत सुधाकर घारे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
मात्र, पोलिसांच्या या कारवाईनंतर कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. सुधाकर घारे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलनासाठी ठाम भूमिका घेतली. महिलांनीही मोठ्या संख्येने पुढे येत पोलिसांच्या कारवाईचा विरोध केला. आपल्या स्थानिक तरुणांच्या रोजगारासाठी प्रसंगी जेलमध्ये जाण्याची तयारी असल्याचे सुधाकर घारे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सुधाकर घारे यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे तातडीने खालापूरमध्ये दाखल झाले. त्यांनी पोलीस प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री यांच्याशीही संपर्क साधण्यात आला. मुख्यमंत्री यांनी स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा वेळ मागितल्याचे सुधाकर घारे यांनी सांगितले.
यानंतर अखेर सुधाकर घारे यांची पोलिसांकडून सुटका करण्यात आली. सुटकेनंतर कार्यकर्त्यांसमोर बोलताना घारे यांनी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्याची घोषणा केली. मात्र हा आंदोलनाचा शेवट नसून, स्थानिक तरुणांना न्याय मिळाला नाही तर पुन्हा अधिक ताकदीने आंदोलन उभारले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
“मंगळवार किंवा बुधवारपर्यंत मुख्यमंत्री स्तरावर चर्चा होईल. या चर्चेत सर्वपक्षीय पदाधिकारी, कंपनी व्यवस्थापन आणि स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मांडला जाईल. तोडगा निघाला तर ठीक; अन्यथा त्याच आठवड्यात शुक्रवार किंवा शनिवार पुन्हा आंदोलन केले जाईल,” अशी भूमिका घारे यांनी मांडली.
विशेष म्हणजे हा लढा केवळ गोदरेज आणि टाटा स्टीलपुरता मर्यादित ठेवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कर्जत-खालापूर परिसरातील ज्या-ज्या कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळत नाहीत, त्या सर्व कंपन्यांमध्ये जाऊन जाब विचारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. शेतकरी कामगार पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, आम आदमी पार्टी, मनसे, वंचित बहुजन आघाडी, आरपीआय यांच्यासह विविध संघटनांचा सहभाग असल्याचे घारे यांनी सांगितले.
स्थानिक रोजगाराचा प्रश्न हा कोणत्याही एका पक्षाचा विषय नसून कर्जत-खालापूरमधील तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याचे सांगत सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, ३ सप्टेंबरचे महा एल्गार आंदोलन सध्या तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी पुढील काही दिवसांत मुख्यमंत्री स्तरावर होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत स्थानिक तरुणांच्या रोजगाराबाबत काय निर्णय होतो आणि कंपन्यांच्या भूमिकेत बदल होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
“तरुणांनी बिनधास्त राहा, न्याय मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही,” असा विश्वास सुधाकर घारे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
जय हिंद! जय महाराष्ट्र!




