खोपोलीत मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा निर्धार
सामाजिक व विकासकामांसाठी एकजुटीने कार्य करण्याचा नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांचा संकल्प

खोपोली, प्रतिनिधी : मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका व खोपोली शहर विभागातील महिला पदाधिकाऱ्यांची सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. रायगड जिल्हा महिला अध्यक्ष सौ. अस्मिता आत्माराम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेच्या प्रारंभी खालापूर तालुका व खोपोली शहर विभागातील नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सौ. अस्मिता साळुंखे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संघटनेची ध्येयधोरणे, उद्दिष्टे आणि कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन केले.
प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या पदाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी, संघटनेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच स्थानिक विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनीही संघटनेने हाती घेतलेला सामाजिक कार्याचा वसा पूर्ण निष्ठेने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. संघटनेच्या माध्यमातून परिसरातील विविध विकासकामांसाठी तसेच सामाजिक प्रश्नांसाठी सर्वजणी एकत्र येऊन सर्व शक्तीनिशी कार्य करू, असा संकल्प त्यांनी केला.
सभेच्या समारोपप्रसंगी सौ. अस्मिता आत्माराम साळुंखे यांनी मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे सर्वेसर्वा व संस्थापक श्री. सदानंदराव भोसले यांनी महिला पदाधिकाऱ्यांवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानले. नवनिर्वाचित सर्व महिला पदाधिकाऱ्यांना पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर सभेची सांगता करण्यात आली.




