धारावीच्या लेकीचा KBC मध्ये डंका; सामाजिक संस्थेकडून रुचिताचा सन्मान

मुंबई :(दत्ता खंदारे /प्रतिनिधी )
परिस्थितीने माणूस कितीही मागे असला तरी ध्येय, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवता येते, हे धारावीतील कुमारी रुचिता आढळराव हिने सिद्ध करून दाखवले आहे.
धारावीच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या रुचिताने बिग बी अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात हॉट सीट पर्यंत धडक मारत आपल्या ज्ञानाच्या जोरावर ५० लाख रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. तिच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या पार्श्वभूमीवर धारावीतील सामाजिक संस्था, झोपडपट्टी पोलीस पंचायत बीट क्र. २आणि धारावी नागरिक समिती यांच्या वतीने गुरुवारी, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी रुचिताचा विशेष गौरव करण्यात आला.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्या राहत्या घरी जाऊन तिचे आणि तिच्या कुटुंबाचे अभिनंदन केले. यावेळी रुचिताला शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक दिलीप गाडेकर, अलका साबळे, सविता शेरखाने, कुंदन तावरे आणि शंकर खिल्लारे उपस्थित होते.
“स्वतःच्या हक्काच्या घरासाठी मी हा खेळ खेळले आणि यशस्वी झाले,” अशी भावना रुचिताने यावेळी व्यक्त केली. तसेच धारावीकरांनी केलेल्या सन्मानाबद्दल तिने आभार मानले. यावेळी तिचे आई-वडीलही उपस्थित होते.
८ बाय १० च्या भाड्याच्या घरात, शौचालयासमोर राहूनही या कन्येने धारावीचे नाव मोठे केल्याबद्दल दिलीप गाडेकर यांनी तिचे आणि तिच्या कुटुंबाचे आभार मानून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या




