Uncategorized

लव्हेज-श्रीरामनगरच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर; ३७ लाखांच्या पाइपलाइन कामाची चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी

खोपोली (देवेंद्र येशीकर) – लव्हेज गाव आणि श्रीरामनगर परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला असून स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठपुराव्यातून लव्हेज गावासाठी नवीन पाइपलाइन टाकण्याकरिता सुमारे ३७ लाख रुपयांचा निधी खोपोली नगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात आला होता. नगरपरिषदेतर्फे हे काम पूर्णही करण्यात आले, मात्र अवघ्या एक ते दीड वर्षांतच ही नवीन पाइपलाइन वारंवार लिकेज होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लव्हेज ग्रामस्थांनी खोपोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष आणि पाणीपुरवठा विभागाला ६ मे २०२६ रोजी लेखी निवेदन देऊनही यावर कोणताही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नसून पाणीपुरवठा अनियमित झाल्याने गृहिणींना घरातील दैनंदिन कामांवर गंभीर परिणाम झाला आहे. नियमित नळपट्टी आणि कर भरूनही प्रशासनाकडून मूलभूत सुविधा का मिळत नाही? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
३७ लाखांच्या निधीतून झालेल्या या कामाची तांत्रिक तपासणी आणि दर्जाबाबत चौकशी (ऑडिट) करण्यात यावी, या कामात त्रुटी किंवा निकृष्ट दर्जा आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करून त्याला ३ ते ५ वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट (अपात्र) करावे, केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता संपूर्ण पाइपलाइनची पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करून पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा तसेच सार्वजनिक पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी आणि कामात पारदर्शकता आणण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशा प्रमुख मागण्या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आल्या असून, या प्रकरणी तात्काळ कुठलीही कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!