महाड तालुक्यात तीनचाकी रिक्षाचालकांची तारेवरची कसरत; वाढत्या इंधन दरांनी उदरनिर्वाह कठीण

महाड | निलेश लोखंडे
ऐतिहासिक क्रांतीभूमी महाड येथे दररोज ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर नागरिक प्रवासासाठी ये-जा करतात. या प्रवाशांसाठी तीनचाकी रिक्षा ही महत्त्वाची वाहतूक सेवा असली, तरी वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे रिक्षाचालकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. कमी भाडे, वाढलेला इंधन खर्च आणि दिवसभराची प्रतीक्षा यामुळे रिक्षाचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.
महाड ते शिरगाव, शिरगाव ते सालीवाडा नाका अशा मार्गांवर कमी भाड्यात प्रवाशांची सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांना वाढत्या इंधन दरांचा मोठा फटका बसत आहे. रिक्षेत मर्यादित प्रवासी घेऊन प्रवास करावा लागत असल्याने मिळणाऱ्या उत्पन्नातून इंधन खर्चही भागत नाही, अशी त्यांची व्यथा आहे.
दिवसभर ऊन-पावसात रिक्षा स्टँडवर उभे राहून प्रवाशांची वाट पाहावी लागते. एखादी फेरी मिळाली तरच हातात काही पैसे पडतात. त्यातून वाहनाची देखभाल, इंधन खर्च आणि घरखर्च भागवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.
रिक्षाचालकांचे म्हणणे आहे की, वाढत्या महागाईमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले असून शासनाने इंधन दरांवरील सवलत, आर्थिक मदत किंवा अन्य कल्याणकारी योजना राबविण्याची गरज आहे.
ग्रामीण भागातील प्रवाशांना अखंड सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांची ही व्यथा शासनापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना होतील का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




