भजनसम्राट कै. सुरेश बुवा यांना द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण अभिवादन
जांभिवली येथे श्रद्धांजली सोहळा संपन्न

कर्जत, प्रतिनिधी : बेधडक महाराष्ट्र
सोमवार, ३ ऑगस्ट २०२६ रोजी कर्जत तालुक्यातील जांभिवली येथे भजनसम्राट कै. सुरेश बुवा यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भजन क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, वारकरी संप्रदायातील भाविक आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले.
कै. सुरेश बुवा हे भजन क्षेत्रातील दर्जेदार व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. आपल्या मधुर आवाजाने, रागदारीवर आधारित भजन सादरीकरणाने आणि अध्यात्मिक सेवेमुळे त्यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. भजनभूषण कैलासवासी गजानन बुवा पाटील यांच्या संगीत भजन परंपरेचा वारसा पुढे नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या भजनांच्या मैफिलींनी जांभिवली गावासह संपूर्ण परिसराला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख मिळवून दिली.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री. अशोक गोविंद थोरवे यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “कै. सुरेश बुवा हे तरुणांसाठी प्रेरणास्थान होते. त्यांच्या कार्याचा आणि संस्कारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांच्या भजनसेवेची आठवण सदैव प्रेरणा देत राहील.”
सर्व कर्जतकरांच्या वतीने तसेच कैलासवासी भजनभूषण गजानन बुवा पाटील स्मारक समिती सदस्य या नात्याने श्री. अशोक गोविंद थोरवे यांनी कै. सुरेश बुवा यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. श्रद्धा, भक्ती आणि कृतज्ञतेच्या वातावरणात हा पुण्यस्मरण सोहळा संपन्न झाला.




