Uncategorized

एकच ध्यास, समृद्ध पर्यावरणाचा विकास; ९ ऑगस्टला भरणे येथे मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचा भव्य मोफत वृक्षरोप वाटप मेळावा

खेड | बेधडक महाराष्ट्र

पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली असून, वाढते प्रदूषण, जागतिक तापमानवाढ आणि बदलते हवामान यावर मात करण्यासाठी वृक्षलागवड हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे प्रतिपादन मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव शंकरराव मोरे यांनी केले. दैनिक बेधडक महाराष्ट्रशी बोलताना त्यांनी सांगितले की, संत तुकाराम महाराजांनी दिलेला “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” हा संदेश आज अधिक महत्त्वाचा ठरला आहे.

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी खेड तालुक्यातील गणेश मंगल कार्यालय, भरणे येथे मराठा समाजबांधव आणि शेतकऱ्यांसाठी मोफत वृक्षरोप वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी पर्यावरण संतुलन, जलसंवर्धन, तापमान नियंत्रण आणि जैवविविधतेच्या संरक्षणात वृक्षांचे असलेले महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. झाडे ही पृथ्वीची फुफ्फुसे असून ती शुद्ध प्राणवायू देतात, भूजलपातळी वाढवतात, मातीची धूप रोखतात आणि पर्यावरणाचा समतोल राखतात. आज लावलेले एक रोप भविष्यातील पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा ठरेल, असेही महेशराव मोरे यांनी सांगितले.

संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण यांनी हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता नसून हरित क्रांतीची सुरुवात असल्याचे सांगितले. तर खेड तालुका अध्यक्ष श्रीराम कदम यांनी सर्व नागरिकांनी कार्यक्रमात सहभागी होऊन मोफत रोपे घेऊन त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग अध्यक्ष अजय तिडके, राष्ट्रीय सल्लागार अशोकराव मोरे, राज्याध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राज्य उपाध्यक्ष गुरुदेव दत्तात्रय झेंडे, मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा सौ. आरती बबनराव दळवी, वैद्यकीय राज्याध्यक्ष चंद्रकांत साळुंके यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हाध्यक्ष कृष्णा शेलार यांनी दिली.

“चला, एक पाऊल पर्यावरणासाठी टाकूया… प्रत्येक गाव हिरवेगार आणि समृद्ध बनवूया,” असा संदेश देत संघटनेने सर्व नागरिकांना या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!