माळशेज घाटातील रस्ता खचल्याने वाहतूक ठप्प; प्रवाशांना पाच तासांचा वळसा

मुरबाड /ठाणे ग्रामीण | प्रतिनिधी
कल्याण–अहिल्यानगर महामार्गावरील मौजे करंजाळे गावाच्या हद्दीत रस्ता खचल्याने माळशेज घाटामार्गे होणारी वाहतूक रविवारपासून पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अहिल्यानगर, पुणे, मुंबई आणि ठाणे या भागांतील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून प्रवाशांसह मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनाही मोठा फटका बसत आहे.
माळशेज घाट हा मुंबई, ठाणे, पुणे आणि अहिल्यानगर यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. दररोज या मार्गावरून दूध, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बस आणि खासगी वाहनांचीही मोठी वर्दळ असते. मात्र रस्ता खचल्याने संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे.
प्रवाशांना आता कर्जत–खोपोली–लोणावळा–तळेगाव–चाकण–नारायणगाव–आळेफाटा किंवा शहापूर–कसारा–इगतपुरी–सिन्नर–संगमनेर–आळेफाटा या पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे साधारण दोन तासांचा प्रवास आता साडेचार ते पाच तासांचा झाला आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, खचलेला रस्ता अवघ्या एका वर्षापूर्वीच नव्याने बांधण्यात आला होता. मुसळधार पावसामुळे डोंगरावरून मोठ्या वेगाने येणाऱ्या पाण्यामुळे संरक्षणासाठी उभारण्यात आलेला गॅबियन बंधाराही काही फूट खाली सरकला आहे. त्यामुळे रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
रस्ता खचल्यानंतर सुरुवातीला वाहतूक वळविण्याचे योग्य नियोजन करण्यात आले नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. घाटाच्या सुरुवातीलाच वाहने थांबवून पर्यायी मार्गाची माहिती न दिल्याने अनेक वाहने थेट खचलेल्या रस्त्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ, इंधन आणि आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, परिस्थिती लक्षात घेऊन पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत आदेश जारी केला असून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनीही वाहतुकीबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत माळशेज घाटातील वाहतूक बंद राहणार असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.




