Uncategorized

मावळतवाडीत श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशरोपण सोहळा 

खेड . : बेधडक महाराष्ट्र

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बिजघर (मावळतवाडी) येथे ग्रामस्थांच्या एकजुटीतून उभारण्यात आलेल्या श्री मारुती मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशरोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून हा धार्मिक सोहळा दि. ९ व १० मे २०२६ रोजी पार पडणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ग्रामस्थांनी “आपलं गाव, आपलं मंदिर” या संकल्पनेतून श्रमदान, आर्थिक मदत आणि नियोजन यांचा संगम साधत मंदिर उभारणीचे कार्य पूर्ण केले आहे. या कार्यात महिला, तरुण व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला असून, गावातील एकजूट आणि सामूहिक भावनेचे दर्शन या उपक्रमातून घडत आहे.

शनिवार, दि. ९ मे रोजी सकाळी ९.१५ ते दुपारी २ वाजेपर्यंत संकल्प, कलश मिरवणूक, कलशरोपण, वास्तुशांती, होमहवन तसेच श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा विधी पार पडणार आहेत. त्यानंतर रात्री ९ ते ११ या वेळेत “जल्लोष कलेचा मराठी मातीचा” या शीर्षकाखाली भजन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, दि. १० मे रोजी सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा होणार असून सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत देणगीदार व मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे. दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्यानिमित्त संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हा उपक्रम केवळ धार्मिक नसून गावातील एकात्मता, परंपरा आणि सामाजिक बांधिलकी दृढ करणारा ठरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

या धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री हनुमान प्रतिष्ठान व मावळतवाडी ग्रामस्थांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!