स्वामी समर्थ सेवा केंद्र व अन्नछत्रालय, पळसदरी आणि अक्षय ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर; ११० जणांचे रक्तदान
पळसदरी :

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व अन्नछत्रालय, पळसदरी आणि अक्षय ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ मठ, पळसदरी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १०.०० ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
या शिबिराला स्थानिक नागरिक, युवक, महिला व भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण ११० जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण सादर केले. रक्तदान हे जीवनदान असून एका रक्तदानामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात, हा संदेश यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिला.
समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तसाठा वाढावा या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अक्षय ब्लड सेंटरच्या वैद्यकीय पथकाने सुरक्षित व नियमानुसार रक्तसंकलन प्रक्रिया पार पाडली. सर्व रक्तदात्यांची नोंदणी, आरोग्य तपासणी व आवश्यक वैद्यकीय चाचण्या करून रक्त संकलन करण्यात आले.
विशेष म्हणजे, शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्याला आयोजकांच्या वतीने सन्मानपत्रासह आकर्षक भेटवस्तू (गिफ्ट) देऊन गौरविण्यात आले. या सन्मानामुळे रक्तदात्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमादरम्यान श्री स्वामी समर्थ मठ परिसरात सेवाभावी व सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. उपस्थित मान्यवरांनी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज व्यक्त केली. धार्मिक स्थळांनी समाजहितासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
या यशस्वी आयोजनासाठी सेवा केंद्राचे पदाधिकारी, अन्नछत्रालयातील स्वयंसेवक व अक्षय ब्लड सेंटरच्या संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली. ११० रक्तदात्यांचा सहभाग आणि त्यांना देण्यात आलेला सन्मान हा या शिबिराचा मोठा यशस्वी टप्पा ठरला.




