राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या करंजाडी–विन्हेरे विभागाध्यक्षपदी अजय शेठ महाडिक यांची नियुक्ती

महाड | निलेश लोखंडे
महाड तालुक्यातील विन्हेरे–करंजाडी विभागातील प्रसिद्ध उद्योजक अजय शेठ महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर त्यांची करंजाडी–विन्हेरे विभागाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रविंद्र चव्हाण, जिल्हा सचिव श्रीहर्ष कांबळे आणि महाड तालुकाध्यक्ष संदीप सकपाल यांनी पुष्पगुच्छ देऊन अजय शेठ महाडिक यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना अजय शेठ महाडिक म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून अपेक्षित विकासकामे होत नसल्याने तसेच माझ्यासोबत असलेल्या तरुण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी नवीन राजकीय वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. रायगड जिल्हाध्यक्ष रविंद्र चव्हाण, जिल्हा सचिव श्रीहर्ष कांबळे आणि तालुकाध्यक्ष संदीप सकपाल यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन मी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला आहे.”
पुढे ते म्हणाले की, महाड विधानसभा मतदारसंघात पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच तरुणांची सक्षम फळी उभी करण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार आहोत.
अजय शेठ महाडिक यांच्या नियुक्तीनंतर महाड तालुक्यातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.




