Uncategorized

सकल मराठा परिवार आयोजित एक दिवा शिवरायांच्या चरणी महादिपोस्तव सोहळा उत्साहात पार

खोपोली प्रतिनिधी – सकल मराठा परिवार रायगड जिल्ह्याच्या वतीने ‘एक दिवा शिवरायांच्या चरणी’ या उपक्रमांतर्गत यंदाचा भव्य महादीपोत्सव सोहळा मोठ्या श्रद्धा, उत्साह आणि शिवभक्तीच्या जयघोषात पार पडला. हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने छत्रपती शिवाजी महाराज चौक, शीळफाटा  खोपोली येथे रविवार दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर व शिवभक्तांनी “जय जिजाऊ, जय शिवराय” असा घोष करत दीपप्रज्वलन केले. दिवाळीच्या पहिल्या दिवशी शिवरायांच्या चरणी दीप अर्पण करण्याची ही परंपरा गेली अनेक वर्षे सकल मराठा परिवाराने जपली असून, यंदाही हा उपक्रम तेजोमय वातावरणात पार पडला. परिसर भगव्या झेंड्यांनी सजविण्यात आला होता. पार्श्वभूमीवर शिवगर्जना आणि मराठी अभिमानाची गाणी वाजत होती. त्यामुळे संपूर्ण वातावरण शिवमय बनले होते.

कार्यक्रमात समाजातील विविध घटक, महिला व युवकांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला. मराठा समाजाच्या ऐक्याचे दर्शन घडविणारा हा सोहळा होता. दीपोत्सवाच्या प्रकाशात शिवभक्तांच्या चेहऱ्यावरचा तेजोमय भाव हा शिवप्रेमाचा प्रत्यय देणारा होता.

या कार्यक्रमास सकल मराठा परिवार जिल्हा समन्वयक रूपाली पिलाने ऋषिकेश कोंडुस्कर, किशोर भोसले, हर्षवर्धन पाटिल, शंकर पिलाने, प्रियंका भोसले स्वप्निल बांगर, श्री. दत्तात्रय पाटील, अ‍ॅड. संदीप नाणेकर यांच्यासह मराठा समाजाचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करून, मराठा समाजाने त्यांच्या आदर्शावर चालत ऐक्य टिकवावे, समाजहितासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन केले. तसेच शिवरायांनी दाखविलेला मार्ग हा फक्त इतिहास नसून तो आजच्या समाजजीवनासाठी प्रेरणादायी आहे, असेही मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

या उपक्रमाचे आयोजन सकल मराठा परिवार (SMP) यांच्या वतीने करण्यात आले होते. “कर्म मराठा, धर्म मराठा” या घोषवाक्याने संपूर्ण चौक दुमदुमून गेला. दिवाळीचा पहिला दिवा शिवरायांच्या चरणी अर्पण करून समाजात एकता, संस्कार आणि अभिमानाचे प्रतीक जपणाऱ्या सकल मराठा परिवाराच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!