Uncategorized

खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रयत्नांना यश; पिंपरी, चिंचवड आणि लोणावळा बोगींचे दरवाजे पूर्ववत खुले

पिंपरी-चिंचवड : सिंहगड एक्सप्रेसने नियमित प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील साधारण दीड महिन्यापासून सिंहगड एक्सप्रेसमधील पिंपरी, चिंचवड आणि लोणावळा बोगींचे मुख्य दरवाजे बंद ठेवण्यात येत होते. गाडी संबंधित स्थानकावर आल्यानंतरच हे दरवाजे उघडले जात असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. मात्र, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर हे दरवाजे पूर्वीप्रमाणे खुले करण्यात आले आहेत.
सिंहगड एक्सप्रेस ही पुणे, पिंपरी-चिंचवड, लोणावळा आणि परिसरातील अनेक प्रवाशांसाठी महत्त्वाची रेल्वे सेवा आहे. दररोज मोठ्या संख्येने नागरिक या गाडीने नोकरी, व्यवसाय, शिक्षण तसेच अन्य कामांसाठी प्रवास करतात. त्यामुळे या गाडीतील प्रवासी सुविधांना विशेष महत्त्व आहे.
मागील दीड महिन्यापासून पिंपरी, चिंचवड आणि लोणावळा बोगींचे मुख्य दरवाजे प्रवासादरम्यान बंद ठेवले जात असल्याने प्रवाशांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली होती. गाडी स्थानकात येताच दरवाजे उघडले जात असल्याने एकाच वेळी मोठ्या संख्येने प्रवासी गाडीत चढण्यासाठी धाव घेत होते. परिणामी प्रत्येक स्थानकावर चढताना मोठ्या प्रमाणात गर्दी, धक्काबुक्की आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण होत होती.
विशेषतः सकाळच्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गाडीत चढताना विशेष अडचणींचा सामना करावा लागत होता. गर्दीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता.
या समस्येची गंभीर दखल घेत प्रवाशांच्या वतीने खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करण्यात आला. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन खासदार बारणे यांनी संबंधित रेल्वे प्रशासनाकडे हा प्रश्न मांडत आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न केले.
खासदारांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले असून सिंहगड एक्सप्रेसमधील पिंपरी, चिंचवड आणि लोणावळा बोगींचे मुख्य दरवाजे पूर्वीप्रमाणे खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना स्थानकावर गाडी थांबल्यानंतर दरवाजे उघडण्याची वाट पाहत एकाच ठिकाणी गर्दी करण्याची वेळ येणार नाही. परिणामी प्रवाशांना गाडीत चढताना होणारी धक्काबुक्की आणि संघर्ष काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
दरवाजे पूर्ववत खुले झाल्याने सिंहगड एक्सप्रेसच्या नियमित प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. प्रवाशांनी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रयत्नांचे स्वागत केले असून, त्यांच्या वतीने खासदार बारणे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!