Uncategorized

भरत गोगावले यांच्या पालकमंत्रीपदाचा नागरी सत्कार; महेंद्र दळवींनी राष्ट्रवादीवर साधला निशाणा

कर्जत : भूषण प्रधान

रायगडचे नवनिर्वाचित पालकमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भरतशेठ गोगावले यांचा कर्जत तालुक्यात नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्या भाषणातून भरत गोगावले यांच्या पालकमंत्रीपदाचे स्वागत करताना कर्जत मतदारसंघातील विविध विकासकामे, स्थानिक रोजगार आणि महायुतीतील राजकारणावर भाष्य केले.

यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, शिवसेनेचे उपनेते शहाजीबापू पाटील, भाजप व आरपीआयचे पदाधिकारी तसेच शिवसेनेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्यांनी संघर्ष केला असल्याचे महेंद्र दळवी यांनी सांगितले. “भरतशेठ हे गरिबांचे आणि सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे. रायगडच्या जनतेने त्यांना आपल्या मनातील पालकमंत्री यापूर्वीच मानले होते,” असे दळवी म्हणाले.

शिवसेनेच्या राजकीय संघर्षाचा उल्लेख करताना दळवींनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये भरत गोगावले यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले. मंत्रिमंडळाच्या स्थापनेवेळी निर्माण झालेल्या परिस्थितीत भरत गोगावले यांनी पक्षहितासाठी स्वतःचे मंत्रीपद मागे घेण्याची तयारी दाखवली होती, असा दावा दळवींनी केला. “सत्याचा पराभव होत नाही. संघर्षानंतर भरतशेठ यांना मंत्रिपद आणि आता रायगडचे पालकमंत्रीपद मिळाले,” असे ते म्हणाले.

दरम्यान, कर्जत मतदारसंघातील रेल्वे उड्डाणपूल आणि विकासकामांच्या श्रेयावरूनही दळवींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. रेल्वे प्रकल्पांसाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी पाठपुरावा केला असून, संबंधित कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. कर्जत नगरपालिकेने रेल्वेकडून मागवण्यात आलेल्या एनओसीबाबतही दळवींनी प्रश्न उपस्थित केला.

महायुतीतील घटक पक्षांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त करताना दळवींनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वावर गंभीर आरोप केले. कर्जत व खालापूर परिसरातील मोठ्या औद्योगिक प्रकल्पांना विरोध करण्याच्या भूमिकेवरूनही त्यांनी टीका केली.

टाटा आणि गोदरेजसारख्या कंपन्यांमुळे परिसरात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याचे सांगत स्थानिक तरुणांना अधिकाधिक रोजगार मिळावा, अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे दळवींनी स्पष्ट केले. कंपन्यांच्या गेटवर मोर्चे काढण्याच्या राजकारणाला विरोध करत, “स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, पण विकास प्रकल्पांना विरोध करून राजकारण करू नये,” असे ते म्हणाले.

यावेळी दळवींनी भविष्यात कंपन्यांविरोधात मोर्चे काढल्यास शिवसेनेकडून प्रतिमोर्चे काढण्याचा इशाराही दिला. त्यामुळे कर्जत-खालापूर परिसरातील महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे.

शेवटी भरत गोगावले यांनी रायगडमध्ये शिवसेना अधिक मजबूत करावी, प्रत्येक घरापर्यंत शिवसेनेचे विचार पोहोचवावेत आणि आगामी काळात रायगडमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवावा, अशी अपेक्षा महेंद्र दळवींनी व्यक्त केली.

भरत गोगावले यांच्या पालकमंत्रीपदाच्या नागरी सत्काराच्या निमित्ताने झालेल्या या भाषणामुळे कर्जत मतदारसंघातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!