Uncategorized

खोपोली नगरपरिषद नगराध्यक्षपदाचा पदभार कुलदीपक शेंडे यांनी स्वीकारला; शोकाकुल वातावरणात साधेपणाने पदग्रहण

खोपोली, बेधडक महाराष्ट्र

खोपोली : खोपोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी आज अधिकृतरित्या स्वीकारला. सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या नुकत्याच झालेल्या दुर्दैवी हत्येच्या पार्श्वभूमीवर हा पदग्रहण सोहळा कोणताही जल्लोष न करता अत्यंत साधेपणाने पार पडला. संपूर्ण कार्यक्रमात शोकाकुल वातावरण होते.
या पदग्रहण सोहळ्यावेळी खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या हस्ते कुलदीपक शेंडे यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, भाजप नेते दीपक बेहरे, शिवसेना नेते विजय पाटील व प्रसाद थोरवे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी उपनगराध्यक्ष मोहन ओसरमल हेही यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी नगरपरिषदेतील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे व मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात नगराध्यक्ष शेंडे यांनी सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या दुःखद हत्येचा उल्लेख करत या पार्श्वभूमीवर पदग्रहण सोहळा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून, अशा वेळी कोणताही आनंदोत्सव साजरा करणे योग्य नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
नगराध्यक्ष शेंडे यांनी आमदार महेंद्र थोरवे तसेच शिवसेना पक्षाने आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. शहराच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. “राजकीय चपला बाहेर ठेवून शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करूया,” असा स्पष्ट आणि ठाम संदेश त्यांनी दिला. प्रशासनाकडून आवश्यक ते पूर्ण सहकार्य मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आगामी काळातील विकासात्मक प्राधान्यक्रम स्पष्ट करताना नगराध्यक्ष शेंडे यांनी शहरातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यावर भर दिला. शहरातील दवाखाने सर्व सोयींनी सुसज्ज करणे, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिवजयंतीपर्यंत शहरात नाट्यगृह उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. याशिवाय नागरिकांच्या सोयीसाठी नवीन सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याच्या कामांना गती देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढील पाच वर्षांत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी यावेळी जाहीर केला. पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, सांस्कृतिक सुविधा व मूलभूत नागरी सोयीसुविधा या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करून खोपोली शहराला विकासाच्या दिशेने नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तातडीच्या बैठकीसाठी आमदार महेंद्र थोरवे मुंबई येथे गेल्याने ते कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र सर्वपक्षीय नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांना शुभेच्छा देत शहराच्या विकासाबाबत अपेक्षा व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!