रेवदंडा येथील वृद्ध महिलेच्या खुनाचा उलगडा; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी
अलिबाग, रायगड

रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील चौल येथील मौने टेकाळकर आळी परिसरात वास्तव्यास असलेल्या वृद्ध महिलेच्या खून व जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड–अलिबाग यांनी यशस्वीपणे उलगडा केला आहे. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती व कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे अवघ्या काही दिवसांत चार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजताच्या पूर्वी मंदा प्रमोद म्हात्रे (वय ७० वर्षे) या वृद्ध महिला आपल्या राहत्या घरात एकट्याच होत्या. याच परिस्थितीचा फायदा घेत आरोपींनी तिच्या घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर आरोपींनी महिलेचा निर्घृणपणे खून केला व तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरी चोरीने चोरून नेले. सदर घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
या घटनेप्रकरणी दि. २९ जानेवारी २०२६ रोजी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक रायगड श्रीमती आँचल दलाल (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक श्री. अभिजीत शिवबरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अलिबाग विभाग श्रीमती माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथके तयार करण्यात आली. या पथकांनी घटनास्थळाचा सखोल अभ्यास केला, तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला तसेच विविध ठिकाणी गोपनीय चौकशी सुरू केली. मोबाईल तांत्रिक माहिती, हालचालींचा मागोवा व स्थानिक माहितीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात आला.
तपासादरम्यान आरोपी क्रमांक १ महादेव ऊर्फ शिवा राधाकिसन ढोबळे (वय २५ वर्षे) यास आष्टी, जिल्हा बीड येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आरोपी क्रमांक २ अशोक अजिनाथ भोसले (वय १९ वर्षे) व आरोपी क्रमांक ३ गणेश उत्तम पंडागळे (वय २५ वर्षे) यांना जाटदेवळा, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथून अटक करण्यात आली. तर आरोपी क्रमांक ४ शुभम एकनाथ पवार (वय २३ वर्षे) यास पेण, जिल्हा रायगड येथून ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून आरोपी क्रमांक १ महादेव ऊर्फ शिवा ढोबळे हा मयत वृद्ध महिलेचा जावई असल्याचे निष्पन्न झाले आहे. कौटुंबिक व आर्थिक कारणांमुळे हा गुन्हा करण्यात आल्याचा संशय असून याबाबत सखोल तपास सुरू आहे.
सदर आरोपींकडून खुनामागील नेमके कारण, गुन्ह्यात वापरलेली साधने तसेच चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्याबाबतचा पुढील तपास रेवदंडा पोलीस ठाणे करीत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.




