सुशांत जाबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्षपदी निवड
महाड, रायगड : निलेश लोखंडे

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील टोळ या गावाचे सुपुत्र आणि उत्साही युवक नेते सुशांत गणेश जाबरे यांनी अलीकडेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या सक्रिय कार्यपद्धती, युवकांमधील लोकप्रियता आणि संघटन कौशल्य पाहता पक्षाने त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवत महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली आहे.
प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते श्री. जाबरे यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीनंतर रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाच्या राज्यस्तरीय संघटनेत रायगड जिल्ह्याला मिळालेल्या या प्रतिनिधित्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
श्री. सुशांत जाबरे हे गेल्या काही वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी युवकांमध्ये संघटनबांधणीसाठी उल्लेखनीय प्रयत्न केले आहेत. त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन दिले आहे. त्यांचे कार्य पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
या नियुक्तीनंतर टोळ ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, तसेच स्थानिक ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. ग्रामस्थांनी या निमित्ताने छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करून श्री. जाबरे यांचे अभिनंदन केले.




