‘देणे नक्षत्रांचे’ या दिवाळी पहाटेच्या बहारदार कार्यक्रमाने ऋतुरंग प्रतिष्ठानच्या नवव्या पर्वाची सुरुवात

ऋतुरंग प्रतिष्ठानच्या आनंदमयी वाटचालीची आठ वर्ष पूर्ण होऊन नवव्या वर्षाची सुरुवात शुक्रवार दि.१७ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे सहा वाजता महाड येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या भव्य नाट्यगृहात ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमाने होत आहे. हिंदी मराठी संगीत सृष्टीतील अजरामर कलाकृतींचा बहारदार नजराणा म्हणजे ‘देणे नक्षत्रांचे’ या बहारदार कार्यक्रमाने महाड,पोलादपूर,गोरेगाव येथील सभासद रसिक तृप्त होणार आहेत. ऋतुरंग प्रतिष्ठानच्या या यशोदायी वाटचालीचे आपण सारे जण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साक्षीदार होणार आहोत. विवेक भागवत निर्मित आणि विघ्नेश जोशी निवेदन करीत असलेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायक अजित परब,गायिका शमिका भिडे,गायक धनंजय म्हसकर,गायिका सई जोशी यांच्या सुमधुर आवाजातील मराठी हिंदी गाण्यांचा नजराणा अनुभवता येणार आहे. रसिकांसाठी दर्जेदार कार्यक्रम उपलब्ध करून देणे आणि त्याचा एकत्रित आस्वाद घेणे याच प्रमुख हेतूने ऋतुरंगची स्थापना झाली आहे.