कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठा राजकीय उलथापालथीचा अंदाज – शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्र येणा?
कर्जत, रायगड : संकेत घेवारे

आगामी कर्जत नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात मोठे उलथापालथीचे संकेत दिसत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे एकत्र येणार असल्याची घोषणा माजी नगरसेवक संतोष पाटील यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे कर्जत तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
संतोष पाटील म्हणाले की, “महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शेकाप हे पक्ष आधीपासून आहेत. मात्र आता राष्ट्रवादी अजित पवार गटालाही आमच्या आघाडीत सामील करण्याचा निर्णय उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत आणि तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे यांच्या संमतीने घेण्यात आला आहे.”
या घोषणेमुळे कर्जत नगरपरिषदेच्या राजकारणात नवीन समीकरण तयार होत आहे. महाविकास आघाडीचे शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) हे सर्व पक्ष एकत्र आल्यास, त्यांचा मोर्चा थेट शिवसेना (शिंदे गट) व भाजप युती झाल्यास त्यांच्या बरोबर असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या कर्जत नगरपरिषदेवर शिंदे गटाचा प्रभाव मजबूत आहे. मात्र, ठाकरे गट आणि अजित पवार गटाच्या संभाव्य युतीमुळे सत्ताधाऱ्यांना मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. या आघाडीत भविष्यात मनसेचा देखील पाठिंबा मिळू शकतो, अशी चर्चा सुरू असून, त्यामुळे ही युती अधिक व्यापक होऊ शकते.
दरम्यान, संतोष पाटील हे प्रभाग क्रमांक ३ मधील मुद्रे विभागातून सर्वसाधारण जागेसाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत. यापूर्वी त्यांनी नगराध्यक्षपदासाठी इच्छाही व्यक्त केली होती. मात्र आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यांनी सर्वसाधारण जागेवर लक्ष केंद्रित केले आहे.
संतोष पाटील यांनी २००९ साली प्रथम निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांनी शिवसेना शहरप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली. २०१४ मध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून आले, तर २०१९ मध्ये त्यांच्या पत्नी नगरसेविका झाल्या. त्यामुळे गेल्या दशकभरात पाटील कुटुंबाने नगरपरिषदेतील उपस्थिती कायम ठेवली आहे.
मुद्रे विभागात पाटील कुटुंबाचा प्रभाव मोठा असल्याने त्यांच्या विजयाची शक्यता जास्त मानली जाते. त्यातच पूर्वीचे प्रतिस्पर्धी असलेले पालकर आणि कडू कुटुंब आता या युतीत सहभागी होण्याची शक्यता असल्याने स्थानिक पातळीवरील एकोपा अधिक दृढ होत आहे.