‘सकल मराठा परिवार’चा वर्धापन दिन उत्साहात साजरा
कर्म मराठा, धर्म मराठा! – बीड येथे राज्यस्तरीय मराठा समन्वयकांचा एकत्रित मेळावा

बीड : बेधडक महाराष्ट्र कर्म मराठा, धर्म मराठा!” या घोषणा आणि मराठा एकतेच्या जयघोषात ‘सकल मराठा परिवार’चा वर्धापन दिन २०२५ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या मराठा समन्वयकांच्या उपस्थितीत बीड येथे आयोजित हा राज्यस्तरीय कार्यक्रम मराठा समाजातील ऐक्य, शिक्षण, समाजकारण आणि सहकार्य या मूल्यांना बळकट करणारा ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जिजाऊ माता यांचा प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी सामूहिकरित्या ‘जय जिजाऊ, जय शिवराय, जय मराठा’च्या घोषणांनी वातावरण भारून टाकले.
सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर – वकील, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते – यांनी मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षण, रोजगार, समाजातील नेतृत्व, आणि एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात विशेष उपक्रम म्हणून, आलेल्या मराठा समन्वयकांनी केवळ सहभागच नोंदवला नाही, तर अतिवृष्टीग्रस्त भागातील गरजू कुटुंबांना संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करून समाजसेवेचा उत्तम आदर्श निर्माण केला. या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विचारमंथन सत्रात ‘सकल मराठा परिवार’च्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात चर्चा झाली. संघटनेने आजवर केलेल्या कार्याचे सिंहावलोकन करण्यात आले आणि पुढील टप्प्यात शिक्षण, उद्योग आणि सामाजिक न्याय क्षेत्रात ठोस उपक्रम हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले.
या वेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, “मराठा समाजाची खरी ताकद ही एकतेत आहे. संघटनेचे उद्दिष्ट केवळ साजरे करणे नसून, समाजातील प्रत्येक घटकाला उभे करणे आहे.”
‘सकल मराठा परिवार’च्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात युवकांना दिशा देण्यासाठी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जनजागृतीसाठी विविध मोहिमा राबवल्या गेल्या आहेत. बीड येथील वर्धापन दिनाने या सर्व प्रयत्नांना एक नवी ऊर्जा दिली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ‘टीम बीड’ने अथक परिश्रम घेतले. व्यवस्थापन, स्वागत, निवास, व भोजन व्यवस्था यासाठी कार्यकर्त्यांनी केलेले नियोजन पाहून सर्व उपस्थितांनी टीम बीडचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व समन्वयकांनी ‘एक मराठा लाख मराठा’ या घोषणेने नव्या जोमाने एकतेचा संकल्प घेतला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या समन्वयकांनी आपली मते व्यक्त करत, संघटनेच्या बळकटीसाठी योगदान देण्याची ग्वाही दिली.
