कर्जत नगरपरिषद अध्यक्षपदाचे आरक्षण घोषित — ओबीसी (महिला) प्रवर्गासाठी राखीव
कर्जत, रायगड

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. ६ ऑक्टोबर) मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीत रायगड जिल्ह्यातील कर्जत नगरपरिषद अध्यक्षपद “ओबीसी (महिला)” प्रवर्गासाठी राखीव ठरले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला जानेवारीअखेरपर्यंत निवडणुका पार पाडण्याचे निर्देश दिल्यानंतर प्रशासनाने गतीने तयारी सुरू केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
राज्यात एकूण १३६ खुल्या प्रवर्गातील नगरपरिषद अध्यक्षपदांपैकी ६८ पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली असून, कर्जत नगरपरिषदेचा यात समावेश आहे. त्यामुळे आता कर्जतमध्ये महिला नगराध्यक्षपदासाठी रंगणार आहे चुरस.
दरम्यान, कर्जत तालुक्यातील खालापूर नगरपंचायत ही नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) या आरक्षणाखाली आली असून, या दोन्ही ठिकाणी महिलांना राजकारणात संधी मिळणार आहे. राज्यातील आरक्षणाच्या या सोडतीनंतर सर्वत्र राजकीय हालचालींना वेग आला असून, स्थानिक पातळीवरील इच्छुक महिला उमेदवारांनी आपले गोट बांधण्यास सुरुवात केली आहे.