हाळ बुद्रुक गावात बडे पीर दस्तगीर गौसपाक यांची ग्यारवी शरीफ उत्साहात साजरी
शेकडो भाविकांची उपस्थिती ; कुराण वाचन, जिक्र, रातीब व नियाज वाटपाने कार्यक्रमात भाविकता

खोपोली / खलील सुर्वे :- मानवतेचा आणि बंधुत्वाचा संदेश देणारे बडे पीर दस्तगीर गौसपाक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात येणारी ग्यारवी शरीफ हाळ बुद्रुक गावात यंदाही मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली. शुक्रवार, 3 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री खोपोली नगरपरिषद हद्दीत येणाऱ्या हाळ बुद्रुक गावात झालेल्या या कार्यक्रमाला मुरीद, भाविक व स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
कार्यक्रमाची सुरुवात हजरत अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह (गौस-ए-आजम) व इमाम अहमद कबीर रिफाई शाफई यांच्या गिलाफावर फुलांची चादर अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर कुराण वाचन, जिक्र, मनकबत आणि नात शरीफ सादर करण्यात आले.
रिफाई सिलसिलाचे खलिफा व मुरीद यांनी डफ, नगाडा वाजवत पारंपरिक पद्धतीने रातीबाने सुरू केला. त्यानंतर फातिहा खानी व संदल चढविण्याचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमानंतर सर्वांसाठी प्रार्थना (दुवा) करण्यात आली. भाविकांना खजूर, नारळ, जर्दा भात (नियाज), नानखटाई आणि विविध मिठाईंचा नियाज वाटप करण्यात आला. गावातील अनेकांनी आपली मन्नत पूर्ण व्हावी, या श्रद्धेने उपस्थित राहून हजेरी लावली. मन्नत पूर्ण झाल्यावर आपल्या मुलांना खजूर किंवा गोड मिठाईने तराजूत तोलून गावात वाटप करण्याची परंपरा यंदाही भाविकांनी जपली.
या कार्यक्रमात गावातील लहानथोरांसह परिसरातील अनेक नागरिक सहभागी झाले. बडे पीर दस्तगीर गौसपाक यांच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्यारवी शरीफ अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली.
हजरत अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह यांना गौस-ए-आजम, गौस-ए-पाक किंवा बडे पीर साहेब म्हणून ओळखले जाते. त्यांच्या स्मृतीदिनी होणारा हा उर्स “ग्यारवी शरीफ” म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी दानधर्म, नियाज आणि आशिर्वाद मिळवण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात.