सामाजिक कार्यकर्ते सुशांत जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे डी.सी. नगर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू
खोपोली, बेधडक महाराष्ट्र

खोपोली–शिलफाटा परिसरातील डी.सी. नगर येथील आरएमसी रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, पादचारी तसेच ज्येष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थ्यांसाठी हा रस्ता धोकादायक बनला होता. या गंभीर समस्येची दखल घेत खोपोली–शिलफाटा येथील सामाजिक कार्यकर्ते सुशांत शिवाजी जाधव यांनी पुढाकार घेत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
पावसाळ्याच्या सुरुवातीला डी.सी. नगर परिसरातील आरएमसी रस्त्यावर पडलेले खड्डे भरून रस्ता सुरळीत करण्याचे काम सुशांत जाधव यांनी स्वतः पुढाकार घेऊन केले होते. मात्र सलग महिनाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील खड्डे पुन्हा उघडले आणि रस्त्याची अवस्था पूर्ववत झाली. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पुन्हा अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सुशांत शिवाजी जाधव यांनी खोपोली नगर परिषदेकडे लेखी अर्ज सादर केला. या अर्जामध्ये डी.सी. नगर येथील रस्त्यावरील खड्डे तातडीने डांबराने भरून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच खराब रस्त्यामुळे होणाऱ्या अपघातांची शक्यता आणि नागरिकांच्या दैनंदिन होणाऱ्या गैरसोयी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली होती.
नगर परिषदेकडून या अर्जाची दखल घेण्यात आली असून अखेर आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी डी.सी. नगर परिसरातील रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. सध्या संबंधित ठेकेदारामार्फत रस्त्यावरील खड्डे डांबराने बुजवण्याचे काम सुरू असून काही भागात रस्त्याची दुरुस्तीही करण्यात येत आहे.
या कामामुळे स्थानिक नागरिक, वाहनचालक, दुचाकीस्वार तसेच परिसरातील व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. पावसाळ्यानंतर अनेक महिने रस्ता खराब अवस्थेत असल्याने नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. आता रस्त्याचे काम सुरू झाल्याने अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते सुशांत शिवाजी जाधव यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले आहे. कोणत्याही पदाचा आधार न घेता, केवळ सामाजिक जाणीवेतून त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे हे काम शक्य झाले, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली. भविष्यातही अशाच प्रकारे रस्त्याच्या दर्जेदार व कायमस्वरूपी दुरुस्तीकडे नगर परिषदेकडून लक्ष दिले जावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




