कुंडलवाडीच्या विकासासाठी नगराध्यक्षांनी प्रशासनाकडे विविध निवेदने सादर केले
अंगणवाडी, ALS रुग्णवाहिका, ग्रामीण रुग्णालय, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी व आरोग्य केंद्रासाठी निवेदने

कुंडलवाडी प्रतिनिधी : श्रीकांत बोलचेटवार
कुंडलवाडी शहरातील नागरिकांना आरोग्य व बालकल्याणाच्या सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नगरपरिषद कुंडलवाडीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्रेरणाताई गजानन कोटलावार यांनी प्रशासकीय स्तरावर ठोस पावले उचलली आहेत. त्यांनी जिल्हा व राज्यस्तरीय अधिकाऱ्यांकडे विविध विषयांवर एकाचवेळी निवेदने सादर करून शहराच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष वेधले आहे.
कुंडलवाडी शहर व परिसरातील लोकसंख्या वाढत असून ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आरोग्य सेवा व बालविकासाच्या सुविधा अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. हे लक्षात घेऊन नगराध्यक्षांनी नवीन ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरू करणे, ३० खाट असलेले वाढवून ५० खाटांचे रुग्णालय मंजूर करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी नेमणे, १०८ कार्डिएक अँब्युलन्स (ALS) उपलब्ध करणे, तसेच विविध भागात नवीन अंगणवाडी केंद्रे मंजूर करणे अशा मागण्या प्रशासनाकडे मांडल्या आहेत.
विशेष म्हणजे, कुंडलवाडी शहरातील विविध भागांमध्ये अंगणवाडी केंद्रांची मोठी गरज असून महिला व बालकांसाठी पोषण आहार, आरोग्य तपासणी, लसीकरण, तसेच बालशिक्षण या सेवा प्रभावीपणे राबवण्यासाठी नवीन केंद्रे मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच गंभीर रुग्णांच्या तातडीच्या उपचारासाठी १०८ ALS रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सध्या तातडीच्या उपचारासाठी नांदेड किंवा इतर ठिकाणी जावे लागते, त्यामुळे वेळ वाचणे अत्यंत गरजेचे असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.यावेळी
नगराध्यक्षा सौ. प्रेरणाताई कोटलावार श्री. गजाननजी कोटलावार, नगरसेविका प्रतिनिधी श्री. संजय खुळगे उपस्थित होते. या निवेदना मुळे कुंडलवाडी शहरातील आरोग्य व बालकल्याण विषयक समस्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडल्या गेल्या असून, लवकरच सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.




