शिळफाटा स्मशानभूमीची दुरवस्था; पत्रकार शिवाजी जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे नगरपरिषदेकडून तातडीची कारवाई
कोसळलेली भिंत, बंद लाईट व अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त; अखेर प्रशासन हलले

खोपोली | बेधडक महाराष्ट्र
खोपोली शहरातील शिळफाटा परिसरातील स्मशानभूमीची अवस्था काही दिवसांपूर्वी अत्यंत दयनीय झाली होती. संरक्षणभिंत कोसळलेली, संपूर्ण परिसरात वाढलेले गवत, अस्वच्छता आणि रात्रीच्या वेळी एकही दिवा सुरु नसल्यामुळे नागरिकांना अंतिम संस्कार करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. संवेदनशील आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत पत्रकार शिवाजी जानू जाधव यांनी नागरिकांच्या तक्रारी खाती घेत शिळफाटा स्मशानभूमीची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी खोपोली नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करून तातडीने दुरुस्ती व सुविधांची मागणी केली होती. त्यांच्या निवेदनात स्मशानभूमीची संरक्षणभिंत कोसळल्यामुळे परिसर असुरक्षित झाल्याचे, लाईट बंद असल्यामुळे रात्री अंतिम संस्कार करणे कठीण होत असल्याचे तसेच स्वच्छतेअभावी दुर्गंधी पसरत असल्याचे नमूद करण्यात आले होते.
दरम्यान, या निवेदनानंतरही प्रश्न त्वरित मार्गी न लागल्याने पत्रकार शिवाजी जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर गुरुवार, दिनांक २२ जानेवारी रोजी त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, खोपोली नगरपरिषदेच्या माध्यमातून स्मशानभूमी परिसरातील बंद असलेली लाईट व्यवस्था सुरु करण्यात आली. यासोबतच वाढलेले गवत काढून परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे.
पूर्वी अंधारात आणि अस्वच्छ वातावरणात अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत होता. अनेक वेळा रात्रीच्या वेळी लाईट नसल्यामुळे दुर्घटना घडण्याचीही भीती व्यक्त केली जात होती. पत्रकार शिवाजी जाधव यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर नगरपरिषद हालचालीत आली आणि प्राथमिक स्वरूपात का होईना, पण आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
या कारवाईनंतर स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. “अखेर तरी स्मशानभूमीकडे प्रशासनाचे लक्ष गेले,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत असून, पत्रकार शिवाजी जाधव यांच्या जागरूकतेमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे बोलले जात आहे. मात्र, संरक्षणभिंतीची दुरुस्ती, कायमस्वरूपी प्रकाशयोजना, पिण्याच्या पाण्याची सोय आणि नियमित स्वच्छता व्यवस्था अद्यापही पूर्णपणे करण्यात आलेली नाही.
नागरिकांचे म्हणणे आहे की, स्मशानभूमी ही केवळ एक जागा नसून प्रत्येक कुटुंबाच्या भावनांशी निगडित असलेले ठिकाण आहे. अशा ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही नगरपरिषदेची जबाबदारी आहे. काही दिवसांपुरती नव्हे तर कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पत्रकार शिवाजी जाधव यांनी देखील “ही केवळ तात्पुरती कारवाई असून उर्वरित कामांचा पाठपुरावा सुरूच राहील,” असे स्पष्ट केले आहे. प्रशासनाने स्मशानभूमीची संपूर्ण दुरुस्ती करून ती सुस्थितीत ठेवावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.



