खोपोलीतील कुस्तीपटू ओंकार जितेंद्र पवार यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार

खोपोली | बेधडक महाराष्ट्र
खोपोली शहरातील रहिवासी व रायगड जिल्ह्याचे नाव राज्यभर उज्ज्वल करणारे होतकरू कुस्तीपटू ओंकार जितेंद्र पवार यांना त्यांच्या उल्लेखनीय क्रीडा कामगिरीबद्दल जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित भव्य सोहळ्यात रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत ओंकार पवार यांचा झालेला हा सन्मान खोपोली शहरासह संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरला.
ओंकार जितेंद्र पवार यांनी लहान वयापासून कुस्ती या खेळाची आवड जोपासली. ग्रामीण आणि सामान्य कुटुंबातून पुढे येत त्यांनी कठोर सराव, संयम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कुस्ती क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दररोज पहाटेपासून सुरू होणारा व्यायाम, मैदानावरील अथक मेहनत आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे त्यांनी तालुका, जिल्हा तसेच राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
विविध स्पर्धांमध्ये पदके व मानाचे किताब पटकावत ओंकार पवार यांनी केवळ वैयक्तिक यश मिळवले नाही, तर खोपोली व रायगड जिल्ह्याचा नावलौकिक वाढवण्याचे कार्य केले आहे. मर्यादित सुविधा असूनही त्यांनी हार न मानता आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्यामुळे आजचा त्यांचा सन्मान हा केवळ एका खेळाडूचा नव्हे, तर संघर्षातून यश मिळवणाऱ्या प्रत्येक युवकाचा सन्मान असल्याची भावना उपस्थितांमध्ये दिसून आली.
जिल्हा क्रीडा पुरस्कार स्वीकारताना ओंकार पवार यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, कुटुंबीय, प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांना दिले. “हा पुरस्कार मला पुढे अधिक मेहनत करण्याची प्रेरणा देणारा आहे. भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल करायचे आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या पुरस्कारामुळे खोपोली परिसरात आनंदाचे वातावरण असून सामाजिक, क्रीडा व राजकीय क्षेत्रातून ओंकार पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक युवकांनी ओंकार पवार यांची वाटचाल प्रेरणादायी असल्याचे सांगत, कठोर मेहनत आणि शिस्त असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही, असा संदेश त्यांनी दिल्याचे मत व्यक्त केले आहे.
जिल्हा क्रीडा पुरस्कारामुळे ओंकार जितेंद्र पवार यांच्या क्रीडा कारकिर्दीला नवे बळ मिळाले असून, भविष्यात ते कुस्ती क्षेत्रात आणखी मोठी मजल मारतील, असा विश्वास क्रीडा रसिक व नागरिकांनी व्यक्त केला आहे.



