मराठा क्रांती स्वराज्य संघटना रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पदी कल्पेश शिंदे – महेशराव मोरे

रत्नागिरी : बेधडक महाराष्ट्र प्रतिनिधी: मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याला गती देण्यासाठी कल्पेश बबनराव शिंदे यांची रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही घोषणा संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव शंकरराव मोरे यांनी केली. संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष सुरतचे उद्योजक विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव यांच्या मार्गदर्शनानुसार ही निवड करण्यात आली.या नियुक्तीमुळे संघटनेच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये—चिपळूण, गुहागर, खेड, दापोली आणि मंडणगड—संघटनात्मक कामाला नवा वेग मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा शेलार म्हणाले,
“कल्पेश शिंदे हे मंडणगड तालुक्यातील सुर्ले गावचे कर्तृत्ववान सुपुत्र आहेत. समाजकारणात त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग असून पंचक्रोशीतील एक प्रभावी नेतृत्व म्हणून ते सर्वपरिचित आहेत.”
कल्पेश शिंदे हे इंदू एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट, सोवेली (मंडणगड) येथे सचिव म्हणून कार्यरत आहेत. याआधी त्यांनी दळवी एज्युकेशन ट्रस्टमध्ये दहा वर्षे कार्य करत अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मार्गदर्शन केले. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. त्याचबरोबर सुर्ले ग्रामस्थ मंडळाचे सचिव म्हणून त्यांनी गावातील विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे.सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत त्यांनी विविध रक्तदान शिबिरे, आरोग्य उपक्रम, क्रीडा स्पर्धा आणि युवकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील उपक्रमांमुळे त्यांनी समाजात विश्वासार्ह नेतृत्व निर्माण केले आहे.
२०२१ साली मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली होती. नागरिकांनी त्यांना मोठा प्रतिसाद दिला होता, मात्र निसटता पराभव झाला. परंतु त्यानंतरही त्यांनी सामाजिक कार्याचा वेग कमी न करता तो अधिक जोमाने सुरू ठेवला.
मराठा क्रांती स्वराज्य संघटनेत जिल्हा उपाध्यक्ष पद ही महत्त्वपूर्ण भूमिका मानली जाते. संघटनेची जाळी मजबूत करणे, ग्रामीण भागातील प्रश्नांना आवाज देणे, तरुणांना संघटनेशी जोडणे आणि मराठा समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणे या जबाबदाऱ्या आता शिंदे यांच्याकडे सुपूर्द झाल्या आहेत.
त्यांच्या नियुक्तीनंतर सामाजिक क्षेत्रातील, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्त्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. सोशल मीडियावरही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




