खालापूर नागरिकांचा नगरपंचायत कार्यालयावर हल्ला बोल. वाढीव घरपट्टी वरुन खरडपट्टी.
खालापूर=दिपक जगताप

नगरपंचायत खालापूर हद्दीत नागरिकांवर जुलमी घरपट्टी करवाढ आकारण्यात येत असून करवाढी विरोधात संतापलेल्या नागरिकांनी मुख्याधिकारी कोमल कराळे आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारला. यावेळी अनेक जबाबदार लोकप्रतिनिधी नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागू नये यासाठी गैरहजर राहिले.
नगरपंचायतीकडून घरपट्टी करामध्ये झालेल्या प्रचंड वाढीचा ठराव नगरपंचायत सत्ताधारी यांच्या संमतीने करण्यात आला आहे. ठराव मंजूर करताना नगरसेवक आणि नगरसेविका यांच्या अज्ञानाचा फायदा उचलून संभाव्य घरपट्टीत पाच पट करवाढ करण्याचा प्रस्ताव आहे.
संतप्त, नागरिकांनी मुख्याधिकारी कोमल कराळे, नगराध्यक्षा रोशना मोडवे यांना विचारणा करण्यासाठी नगरपंचायत कार्यालय गाठले. नागरिकांनी प्रश्नाची सरबत्ती करत मुख्याधिकारी यांना जेरीस आणले.
नगरपंचायतीने शालेय विद्यार्थ्यांमार्फत सर्वेक्षण करून घरांच्या क्षेत्रफळावर आधारित कर आकारणी केली आहे. अनेक नागरिकांनी आक्षेप नोंदविला . मात्र त्यानंतर पुनःसर्वेक्षणाबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्या वेळी नगरपंचायतीचे प्रतिनिधीही उपस्थित नव्हते व ठेकेदाराने मनमानी पद्धतीने सर्वेक्षण केले असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणत करवाढ रद्द करावी अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मुख्याधिकारी घामाघूम झाल्या होत्या. घरपट्टी बाबत निर्णय ठोस न केल्यास नगर पंचायत बरखास्त करण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे.





