यशवंत नगरात खळबळ! शिवाजी जाधव यांच्या विकासकामाचा बॅनर गायब — “कोणाचा डाव?” असा सवाल!
रायगड

खोपोली (प्रतिनिधी) – प्रभाग क्रमांक 10 मधील यशवंत नगर दोन नंबर येथे रातोरात रहस्यमयरीत्या गायब झालेल्या बॅनरने संपूर्ण परिसरात चर्चा तापली आहे.समाजमंदिर रोडवर शिवाजी जाधव यांनी केलेल्या विकासकामाचा मोठा बॅनर अचानक चोरीला गेला, आणि आता हा प्रकार केवळ “बॅनर चोरी” नसून राजकीय खुन्नस असल्याची चर्चा गल्लीबोळात रंगली आहे!
14 ऑक्टोबर रोजी सकाळी लावलेला बॅनर काही तासांतच उडाला. कोणत्याही प्रकारचा मागमूस न लागल्याने रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.“विकास दिसायला नको म्हणून कोणीतरी जाणूनबुजून हा डाव रचला का?” असा प्रश्न नागरिक विचारताना दिसत आहेत.दरम्यान, शिवाजी जाधव यांनी पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह काही संशयित व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले जात आहे.स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, “शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात जेवढं काम झालं, ते पाहून काहींना हे डोळ्यात खुपलं असावं. म्हणूनच बॅनरचं बळी देण्यात आलं!”
या घटनेनंतर सोशल मीडियावर देखील संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी “विकास थांबवता येणार नाही, बॅनर नाही तर जनता बोलते!” अशा हॅशटॅगने आपली भूमिका मांडली आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं असून, दोषी सापडल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहे