व्हॉइस ऑफ मीडिया राज्य अधिवेशन 2025 लोगोचे भव्य उद्घाटन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते संपन्न
पिंपरी चिंचवड, पुणे

पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या राज्य अधिवेशन 2025 चा लोगोचे भव्य उद्घाटन मावळ मतदारसंघाचे संसदरत्न, जनसंपर्कात अग्रेसर आणि जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेले माननीय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या शुभहस्ते पार पडले. या कार्यक्रमाला पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मान्यवर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी व्हॉइस ऑफ मीडिया रायगड जिल्हा अध्यक्ष अभिजीत दरेकर, रायगड कार्याध्यक्ष संकेत घेवारे, उपाध्यक्ष सचिन यादव, कृष्णा सगणे, तसेच खालापूर तालुका अध्यक्ष दिपक जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेत, माध्यम क्षेत्रातील एकजूट, पारदर्शकता आणि समाजाभिमुख पत्रकारितेचा संदेश दिला.
खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी आपल्या व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेने अल्पावधीत राज्यभरातील पत्रकारांना एकत्र आणून दिलेल्या मंचाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “पत्रकारिता ही समाजाचा आरसा असून, निर्भीड आणि जबाबदार पत्रकारच जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहोचवू शकतात. आजच्या डिजिटल युगात सत्य, पारदर्शक आणि जनहिताची बातमी देणाऱ्या पत्रकारांची गरज पूर्वीपेक्षा अधिक आहे.”
यावेळी त्यांनी उपस्थित सर्व पत्रकारांसोबत संवाद साधून जनसंपर्क केला आणि त्यांच्या समस्या व मागण्याही जाणून घेतल्या. व्हॉइस ऑफ मीडिया राज्य अधिवेशन 2025 हे पत्रकारांना दिशा आणि बळ देणारे अधिवेशन ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




