टाटा पॉवर कंपनीच्या ” जीवघेण्या ” मनमानी कारभारा विरोधात भिवपुरी ग्रामस्थ आक्रमक !
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न केल्याने " साखळी उपोषणाला " सुरुवात..

न्याय न मिळाल्यास आंदोलन होणार अधिक तीव्र , प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – कर्जत तालुक्यातील भिवपुरी ग्रामपंचायत हद्दीत येणारे गेली १०० वर्षांचा इतिहास असलेला ” जल विद्युत टाटा पॉवर प्रोजेक्ट ” गेली अनेक वर्षे येथील प्रकल्पग्रस्तांच्या ” हक्क व अधिकारांना ” मूठ माती देत असताना आता नव्याने होणाऱ्या ” उदंचन प्रकल्प १००० मेगावॅट ” संदर्भात प्रकल्पग्रस्तांच्या योजना , मागण्या, नोकरी रोजगार , उद्योग सेवा , शिक्षण , आरोग्य सेवा आदी सेवा डावलून कंपनी व्यवस्थापन मनमानी करून प्रकल्पग्रस्तांचा हक्क डावलल्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त संतप्त झाले असून ” टाटा पॉवर कंपनीच्या ” विरोधात सोमवार दिनांक ०६ ऑक्टोंबर २०२५ पासून भिवपुरी कॅम्प कटिंग गेट येथे साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे .
टाटा पॉवर कंपनी लि . भिवपुरी कॅम्प, ता. कर्जत, जि. रायगड यांचा ” भिवपुरी उदंचन प्रकल्प १००० मेगावॅट प्रकल्प ” हा केंद्र सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने मंजूर केला असून त्यामध्ये जनसुनावणी दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत भिवपूरी (कॅम्प) ने सादर केलेल्या अहवालातील सर्व योजनांचा तसेच मागण्यांचा टाटा पॉवर कंपनीने सदरहू मागण्या ” CER ” मध्ये सामाविष्ट करण्यात येतील , असे लिखित उत्तर दिले आहे , तसेच केंद्र सरकारच्या वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने सदरहू योजना विशिष्ट आणि मानक अटी शर्ती घालूनच पर्यावरण मंजुरी दिली असून त्यामधील अटीची पूर्तता न झाल्यास मंजुरी रदद करण्यात येईल , असे स्पष्टपणे नमूद केले आहे. तर मा. जिल्हादंडाधिकारी, रायगड यांनी देखील सदरहू पर्यावरण मंजूरी हि शासनाच्या अटी बंधनकारक असल्याचे आपल्या NOC मध्ये नमूद केले आहे. या प्रकल्पास घटना आणि कायद्याच्या नियमांच्या अधीन राहून भिवपुरी ग्रुप ग्रामपंचायत व प्रकल्पग्रस्त हे टाटा पॉवर कंपनीस संपूर्ण सहकार्य करीत असूनही कंपनी मनमानी करुन प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करत आहे . येथील भूमिपुत्रांना नोकरी, काम न देता बाहेरील राज्यातील कामगारांना प्राधान्य , तसेच ग्रामपंचायत हद्दीतील शाळा , अंगणवाडी, सोलर लाईट सोलर पैनल, रस्ते, पाणी, आरोग्य या मुलभूत सुविधांचे एकही कार्य त्यांनी केंद्र सरकारला दिलेल्या ” Action plan ” प्रमाणे सुरु केले नाही किंवा अर्धवट करून सोडून दिले आहे . तापकीर वाडी येथील धनगर वाड्याला ब्लास्टिंग मुळे त्यांच्या कुटुंबीयांना , लहान बालकांना , महिलांच्या जीवाला धोका असल्याने त्यांचे स्थलांतर करणे , ध्वनी प्रदूषण व ब्लास्टिंगमुळे वन्य पशु पक्षांच्या जिवाला धोका , वाड्या वस्तीच्या घरांना तडे , बोअरवेलचे झरे बंद झाल्याने पाणी टंचाई , पिण्याचे दूषित पाणी , त्यामुळे साथीचे आजार , झाडे तोडल्यामुळे माकडे गावात येऊन घरांचे , पिकांचे , फळ झाडांचे नुकसान करत आहेत , बाहेरील मजुरांमुळे गुन्हेगारी क्षेत्रात वाढ होऊ शकते , स्थानिक भूमिपुत्रांना शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार देणे , छोटे मोठे व्यवसाय देणे , २४ तास फिरता दवाखाना , ॲम्ब्युलन्स सेवा , सुसज्ज हॉस्पिटल , रस्ते काँक्रीटीकरण , सौर दिवे , पांडव ऐतिहासिक तलावाची जोपासना , ग्रामपंचायत हद्दीत सुधारणा , अश्या अनेक मागण्या प्रकल्पग्रस्तांनी नियमानुसार केल्या आहेत .
केंद्रसरकार , राज्य सरकार , मा. जिल्हादंडाधिकारी, यांनी आदेशात पारीत केलेले असताना कर्जत पंचायत समिती, भिवपुरी ग्रामपंचायत , ग्रामसभा यांचे आदेश, अटी, डावलून कंपनीचे वीज प्रोजेक्ट कार्य ग्रामस्थांच्या मागण्या मान्य न करता त्यांना डावलून , ग्रामस्थांना जीवघेणा त्रास देऊन सुरू असल्याने आमच्या मागण्या जोवर मान्य होत नाही , तोवर हे साखळी उपोषण , त्यानंतर प्राणांतिक उपोषण , असे आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचे ग्रामस्थांच्या व महिला भगिनींच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत .
याबाबतचे संतप्त निवेदन भिवपुरी प्रकल्पग्रस्त नागरिकांनी मा. रायगड जिल्हाधिकारी , कर्जत प्रांत अधिकारी , तहसीलदार कर्जत , पंचायत समिती गटविकास अधिकारी कर्जत , सरपंच ग्रुप ग्रामपंचायत भिवपुरी कॅम्प, टाटा पॉवर मॅनेजमेंट भिवपुरी डिव्हीजन, पोलीस निरीक्षक कर्जत पोलीस स्टेशन, टाटा पॉवर हेड ऑफिस बॉम्बे हाउस, काळा घोडा, फोर्ट-मुंबई येथे दिले आहेत. यावर आता शासन , प्रशासन काय निर्णय घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .