Uncategorized

‘ऋतुरंग प्रतिष्ठान’- महाडच्या सांस्कृतिक चळवळीतील मानाचं पान:…..

साहित्य,कला,संस्कृती,सामाजिक भान जपणारे महाड हे ऐतिहासिक शहर….इतिहासाची साक्ष देणारे शहर म्हणून जगात उल्लेखनीय…!

|| लौकिकाने मोठे महाड,सर्व क्षेत्रात निराळा ठसा

कला साहित्य संस्कृतीचा, जपतात येथे वारसा ||

याच शहरात गेली अनेक वर्षे ऋतुरंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ वृध्दींगत करण्याचे महत्त्वाचे काम केले जात आहे.

रोजच्या धकाधकीच्या जगण्यातून काही विरंगुळ्याचे क्षण सगळ्यांनाच हवेहवेसे वाटतात. निराशेचे मळभ आलेल्या मनाला ते आशावादी करणारे ठरतात. स्वच्छंदी जगायला शिकवतात.

वि.पां.दांडेकर यांच्या म्हणण्यानुसार ‘आंबट तोंड आणि लांबट चेहरा करून जीवनाचा गाडा हाकण्यात काय अर्थ आहे.’ जगावे तर फुलपाखरासारखे स्वच्छंदी …

रु.१५००/ इतकी मापक वार्षिक वर्गणी देवून झालेल्या सभासदांना ऋतुरंग प्रतिष्ठान वर्षातून चार दर्जेदार कार्यक्रम देवून एक प्रकारचा आनंद वाटण्याचे काम करते आहे. या कार्यक्रमामुळे प्रत्येक सभासद वर्षभर त्या आनंदी आठवणी उराशी घेवून वावरत असतो. असे म्हणतात,’तुम्ही किती आनंदी आहात,त्यापेक्षा तुमच्यामुळे किती जणांना आनंद होतो हे जास्त महत्त्वाचे आहे.’

|| वेदनेवर फुंकर घालते हळूच सुरेल गाणे |

गाणे शिकविते ऋतुऋतुंच्या रंगात मिसळून जाणे ||

संकटाच्या वेदनेच्या समयी सांगीतिक,नाट्यमय कार्यक्रम सांस्कृतिक गारवा देणारे ठरतात.

या सांस्कृतिक चळवळीला साहित्याची झालर

गाणे सादर करणाऱ्या गायकाच्या बरोबरीने ते गाणे लिहिणारा गीतकार,कवी तितकाच महत्त्वाचा असतो. त्याच्या साहित्याचा प्रचार प्रसार करणारा निवेदक म्हणजे त्या कार्यक्रमाचा आरसा असतो. निवेदकाची निवेदनातील लेखन सामुग्री म्हणजे त्याच्यातील एक साहित्यिक असल्याची जाणीव निर्माण करून देते. नाटकातील अभिनेते ज्या संहितेवर अभिनय करतात त्या संहितेचा लेखक आपल्या लेखनातून दुःख,यातना,आनंद,सामाजिक समस्या जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. ऋतुरंग प्रतिष्ठान सांस्कृतिक चळवळ समृध्द करत असतानाच साहित्याची वृद्धी देखील करत आहे.

ऋतुरंग प्रतिष्ठान एक परिवार आहे. इथे कोण मोठा कोण लहान नाही. सर्व मिळून समरसतेने काम करीत असतात. पडेल ते काम करून चळवळ मजबूत करीत आहेत. प्रसंगी स्वखर्चाने ही सांस्कृतिक चळवळ अंगी-खांदी बाळगून प्रत्येक कार्यकर्ता ते मार्गदर्शक ऋतुरंग प्रतिष्ठानचा वर्गणीदार सभासद आहे.    कवी गोपाळ नरहर नातू यांच्या

|| मी नव्हे शिल्पज्ञ मोठा तंत्र नव्हते माहिती

चार धोंडे जोडणारी ही किनाऱ्याचीच माती

फक्त तिचा चिखल व्हाया अंतरी मी ओळलो

या नदीला घाट छोटा बांधुनी मी चाललो ||

या ओळीप्रमाणे निरपेक्ष वृत्तीने प्रत्येक जण काम करत आहे.

ऋतू ऋतूंचे गाणे गाणारे, मनामनाला जोडणारे,आनंदाचा आविष्कार करणारे,आनंदाचा उत्सव साजरा करणारे हे प्रतिष्ठान भविष्यात अधिक समृध्द होण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा…

✍️गंगाधर साळवी,महाड

समन्वय समिती सदस्य,ऋतुरंग

८३०८७०४१३०

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!