
पनवेल / श्रेयस ठाकूर
पनवेल महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांना आगीच्या आपत्तीचा सामना अधिक सक्षमपणे करता यावा, यासाठी पनवेल महापालिकेच्या संबंधित विभागाकडून फायर प्रॉक्सिमिटी सूट अद्याप देण्यात आले नाहीत. आग लागलेल्या भागात प्रवेश करून आगीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे सहज शक्य व्हावे, या उद्देशाने फायर प्रॉक्सिमिटी सूट निर्मिती करण्यात आली आहे. हा सूट परिधान करून फायरमन आग लागलेल्या भागात जाऊन ६० अंश सेल्सिअस तापमान असेल तरीही काम करू शकतो. यामध्ये हेलमेट, ग्लोव्हज, शर्ट, पॅन्ट आणि गम बूट इत्यादींचा समावेश आहे. मात्र अद्यापही पनवेल महापालिकेने अग्निशमन दलाच्या जवानांना सुरक्षितता म्हणून फायर प्रोक्सीमिटी सूट देण्यात आले नसल्याने भविष्यात एखाद्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवाने कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास त्यास सर्वस्वी पनवेल महापालिकेला जबाबदार धरावे तसेच पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी लवकरात लवकर या सुटचे वितरण करावे अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांनी यावेळी सांगितले. दिवाळी सण जवळ आला असून सणनिमित्त ठिकठिकाणी फटाके दुकाने लागलेली आहेत अशावेळी अनेकदा आगीसारख्या भयंकर घटना घडतात व जीवितहानी मृत्यूहानी होत असते यावेळी अग्निशमन दलाचे जवान आपल्या प्राणाची बाजी लावून आपले कर्तव्य करत असतात अशातच त्यांना अद्याप फायर सेफ्टी सूट न मिळणे म्हणजे शरमेची बाब आहे नुकतेच दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी दिवा पूर्व येथे टोरंट कंपनीच्या ओव्हरहेड वायरवर कबुतर अडकल्याची माहिती मिळताच दिवा बिट अग्निशमन केंद्राचे जवान 1 रेस्कयू व्हॅन घटनास्थळी पोहचले व कबुतराची सुटका करताना 2 जवानांना ओव्हरहेड वायरचा विजेचा धक्का बसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असता यामध्ये उत्सव पाटील दिवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर आझाद पाटील पालघर यांना हाताला व छातीला भाजले आहे. तरी असा प्रकार सुरक्षिततेच्या अक्षमतेमुळे पनवेल महापालिका हद्दीत घडायला नको म्हणून आयुक्त मंगेश चितळे यांनी तात्काळ पनवेल महापलिका अग्निशमन दलाच्या जवानांना फायर सेफ्टी सूट उपलब्ध करून द्यावे अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांनी पत्राद्वारे केली आहे.