प् प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून; रायगड पोलिसांनी उघडकीस आणला क्लिष्ट गुन्हा
अलिबाग, नागोठणे

अलिबाग (जि. रायगड), दि. १६ ऑक्टोबर २०२५ —
रायगड जिल्ह्यातील नागोठणे पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत क्लिष्ट आणि धक्कादायक स्वरूपाचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. तब्बल काही दिवस बेपत्ता असलेला एक तरुण अखेर आपल्या पत्नीच्या आणि तिच्या प्रियकराच्या कटात सापडून मृत्यूमुखी पडल्याचे या तपासातून स्पष्ट झाले आहे.
नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 130/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103, 238, 61(2), 140(1), 324(4), 3(5) अन्वये दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास मा. पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभिजीत शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रसाद गोकुळे (रोहा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
सहायक पोलीस निरीक्षक सचिन अशोक कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, नरेश थळकर, तसेच महेश लांगी, प्रशांत भोईर, चंद्रशेखर नागावकर, मनीषा लांगी, दीपा पाटील आणि प्रकाश हंबीर यांनी संयुक्तरीत्या तपास करून आरोपींना गाठले.
कृष्णा नामदेव खंडवी (वय 23, रा. गौळवाडी, ता. पेण) हा युवक काही दिवसांपासून बेपत्ता झाला होता. त्याबाबत त्याच्या नातेवाईकांनी मनुष्य बेपत्ता रजिस्टर क्रमांक 27/2025 अन्वये नागोठणे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी नागोठणे शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच बेपत्ता व्यक्तीच्या मोबाईलचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि लोकेशन डेटा मागवून त्याचे विश्लेषण केले. या तांत्रिक तपासातून काही संशयित क्रमांक पोलिसांना मिळाले. या आधारे रायगड आणि नाशिक परिसरात चौकशी सुरू करण्यात आली.
तपासात उघड झाले की, मयताची पत्नी दिपाली अशोक निरगुडे (वय 19, रा. मोहाडीवाडी, ता. पेण) हिचे नाशिकमधील उमेश सदू महाकाळ (वय 21, रा. बारीमाळ, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) याच्याशी गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या दोघांना लग्न करायचे होते, मात्र दिपालीचा विवाह झाल्यामुळे अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे पतीला आडवे येत असल्याने दोघांनी त्याचा खून करण्याचा कट रचला.
या कटात सुप्रिया प्रकाश चौधरी (वय 19, रा. आडगाव देवळा, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) हिने त्यांना मदत केली. सुप्रियाने “पायल वारगुडे” या बनावट नावाने इंस्टाग्रामवर खाते तयार करून कृष्णा खंडवीशी संपर्क साधला. काही दिवस संभाषण सुरू ठेवल्यानंतर तिने कृष्णाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि १० ऑक्टोबर २०२५ रोजी नागोठणे येथे भेटायला बोलावले.
ठरलेल्या योजनेनुसार आरोपी उमेश आणि सुप्रिया हे मोटारसायकलवर नागोठणे येथे आले. कृष्णा त्यांच्यासोबत मोटारसायकलवर बसला. दोघांनी त्याला नागोठणेहून वासगावजवळील जंगल भागात नेले. तेथे उमेश महाकाळ यांनी ओढणीने गळा आवळून आणि डोक्यावर वार करून कृष्णाचा खून केला.
सुप्रिया आणि दिपाली यांनी त्याला मदत केली. मृतदेह ओळखू येऊ नये म्हणून चेहरा आणि छातीवर केमिकल टाकून पुरावे नष्ट करण्यात आले.
यानंतर त्यांनी मृताच्या खिशातील मोबाईल फोन घेतला, त्यातील सिमकार्ड काढून मोबाईल फोडला आणि पाली परिसरात फेकून दिला. पोलिसांनी तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्हीच्या आधारे तिघांना गाठून अटक केली.
आरोपींची माहिती: १) दिपाली अशोक निरगुडे (वय 19), रा. मोहाडीवाडी, ता. पेण २) उमेश सदू महाकाळ (वय 21), रा. बारीमाळ, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक ३) सुप्रिया प्रकाश चौधरी (वय 19), रा. आडगाव देवळा, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक सदर तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास नागोठणे पोलीसांकडून सुरू आहे.
रायगड पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींसोबत संबंध ठेवताना सावधगिरी बाळगावी. तोंड झाकून, रुमाल किंवा स्कार्फ बांधून फिरणारे व्यक्ती किंवा संशयास्पद हालचाल करणारे इसम दिसल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. कोणतीही माहिती लपवू नये, तर ती पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड-अलिबाग यांनी केले आहे.