
कर्जत तालुक्यातील चिंचवाडी गावातील शेतकऱ्याच्या गोठ्यातून बैल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना नेरळ पोलिसांनी अटक करून तब्बल तीन गुन्ह्यांचा छडा लावला आहे.
२३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री फिर्यादी योगेश विठ्ठल पारधी यांच्या गोठ्यातून दोन बैल चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली होती. फिर्यादींच्या ३० हजार रुपये किंमतीच्या बैलांची चोरी ग्रे रंगाच्या कारमधून करण्यात आली होती.
सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी निलेश कोंडार आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी इमरान अहमद शेख (२६) आणि इम्तीयाज इलियाज शेख (३२) यांना कल्याण येथून अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीसाठी वापरलेली मारुती सुझुकी कार (MH-02-BJ-2753) आणि ३०,००० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
तपासादरम्यान दोन्ही आरोपींनी बैलचोरीची कबुली दिली असून, त्यांच्या साथीदारांपैकी एक अलौद्दिन (रा. कल्याण) आणि दुसरा वसीम कुरेशी (रा. मुंब्रा) फरार आहेत. आरोपींनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे व नेरळ हद्दीत घडलेल्या अन्य दोन गोवंश चोरीच्या गुन्ह्यांची कबुलीही दिली आहे.
या कारवाईत पो.उ.नि. भास्कर गच्चे, पोना. सचिन वाघमारे, पोशि. राजेभाऊ केकाण, अश्रुबा बेंद्रे आणि विनोद वांगणेकर यांनी सहभाग घेतला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.