मोबाईल चोरी प्रकरणी कर्जत पोलिसांची धडाकेबाज कारवाई — नांदेड येथील आरोपी अटकेत
कर्जत, रायगड

कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांचे मोबाईल फोन्स तसेच ओटीडीआर मशीन चोरीला गेल्याच्या तक्रारींवर तातडीने आणि काटेकोर तपास करून कर्जत पोलिसांनी एका आरोपीस अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
ही कारवाई रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक मा. श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिजीत शिवथरे, तसेच कर्जत विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. राहूल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव चंद्रकांत माधव अनकाडे (रा. दैठणा, ता. कंधार, जि. नांदेड) असे असून, त्याला दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. या आरोपीचा गुन्हेगारी पूर्वइतिहास असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
गुन्हा रजिस्टर क्र. ९८/२०२५, बी.एन.एस. कलम ३०६ प्रमाणे हा गुन्हा दि. ४ मार्च २०२५ रोजी कर्जत पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. नागरिकांकडून गहाळ मोबाईल व अन्य मालमत्ता चोरी झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या सर्व प्रकरणांचा सखोल तपास सुरू केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फूटेज तपासणी आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने आरोपीचा माग काढला.
या संपूर्ण कारवाईत पोलीस निरीक्षक श्री. संदीप भोसले, पो.उ.नि. सुशांत वरक, पोहवा स्वप्नील येरुणकर (१०८८), पोहवा समीर भोईर (१२७२), पोना प्रविण भालेराव (२२७८), पोना केशव नागरगोजे (२३३१) आणि पोकॉ विठ्ठल घावस (२१७०) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
पोलिसांच्या दक्ष आणि तांत्रिक तपासामुळे आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरी गेलेल्या मालमत्तेचा मोठा भाग हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईबद्दल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.