कर्जतमध्ये चोरीचे प्रमाण वाढले; दोन गुन्ह्यांची नोंद, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कर्जत, रायगड

कर्जत – कर्जत शहर व परिसरात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. नुकत्याच दोन वेगवेगळ्या प्रकरणांत सोन्याचे दागिने आणि रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला असून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
पहिली घटना १ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.४५ वाजता मौजे दहिवली येथील यशदा मंगल कार्यालयाजवळ घडली. फिर्यादी हे पुष्पराज अपार्टमेंट, सुयोग नगर दहिवली येथील रहिवासी असून, ते बसची वाट पाहण्यासाठी थांबले असताना दोन अनोळखी इसमांनी बनावट स्पॅचींगची बतावणी करत फसवणूक केली. त्यातील एक जण मोटारसायकलवर आला तर दुसरा इसम त्यांच्याजवळ थांबला. या दोघांनी फिर्यादी यांना संभाषणात गुंतवून त्यांच्या गळ्यातील सुमारे ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन व हातातील अंगठी बॅगेत ठेवण्यास भाग पाडले. मात्र, बॅगमधील दागिने नकळत काढून मोटारसायकलवरून फरार झाले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाणे गु.र. नं. 250/2025, भा.न्याय.सं. 2023 कलम 318(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि राहुल वरोटे करीत आहेत.
दुसरी घटना ८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत सोनार आळी दहिवली येथे घडली. महिला फिर्यादी यांच्या घरातील वरच्या मजल्यावरील कपाटातून चोरट्यांनी १ लाख २८ हजार ८३० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाणे गु.र. नं. 251/2025, भा.न्याय.सं. 2023 कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल झाला असून पोहवा समीर भोईर पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपीस १ ऑक्टोबर रोजी रात्री ९.१६ वाजता अटक केली आहे.
दोन्ही घटनांमुळे कर्जत परिसरात भीतीचे व अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा ढवळ्या बनावट स्पॅचींग करून नागरिकांची फसवणूक केली जात आहे, तर दुसरीकडे घरफोडी करून चोरटे दागिने लांबवित आहेत. यामुळे नागरिकांनी सतत सावध राहण्याची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कर्जत शहर व तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून घरफोडी, चोरी, चैन स्नॅचिंगसारख्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना आहे. पोलिसांकडून तपास सुरू असला तरी अशा घटनांना आळा बसण्यासाठी गस्त वाढविणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व नागरिकांनीही सतर्क राहणे गरजेचे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.