Uncategorized

कर्जत परिसरात पिसाळलेल्या बैलाचा हल्ला — एकाचा मृत्यू, अनेक जण जखमी; हेल्प फाउंडेशनच्या व पशुवैद्य जितेंद्र लाड यांच्या मदतीने बैलाला पकडण्यात यश!

कर्जत, रायगड,

आज दिनांक २३ रोजी पहाटेपासूनच कर्जत छ.संभाजी महाराज चौकामध्ये एक पिसाळलेला बैल थैमान घालत असल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात अर्जुन म्हसे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, आणखी पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या बैलाला काही दिवसांपूर्वी एका कुत्र्याने चावा घेतल्यामुळे तो पिसाळल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अचानक हल्ला करणाऱ्या या बैलामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. नागरिकांमध्ये गोंधळ उडाला असून, अनेकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घरांच्या आत आसरा घेतला होता.

दरम्यान, या बैलाला पकडण्यासाठी खोपोली येथील “हेल्प फाउंडेशन” या संस्थेने पुढाकार घेतला. त्यांच्या पथकाने पशुवैद्य डॉ. जितेंद्र लाड यांच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेतली. तासभराच्या प्रयत्नांनंतर डॉ. लाड यांनी बैलाला भुलीचे इंजेक्शन देऊन नियंत्रणात आणण्यात यश मिळवले. अखेर स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांनी भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने भटक्या जनावरांवर व कुत्र्यांवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!