Uncategorized

खोपोली शिळफाटा भाजी मार्केट बनला जुगाराचा अड्डा !

भाजी मार्केटची जीर्ण इमारत कोसळली तर जबाबदार कोण ?

 लोकसेवकांच्या कामात गुंतलेले अधिकारी, मात्र नागरिक धोक्यात

तर मुख्याधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा !

न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार खलील सुर्वे यांची मागणी

खोपोली / विशेष प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषदेच्या कारभाराचा बोजवारा आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे शिळफाटा भाजी मार्केट परिसर हा आज “चरस, अफीम, गांजा, दारू आणि जुगारांचा अड्डा” बनला आहे. जीर्ण झालेली इमारत, दुर्गंधीयुक्त वातावरण आणि नगर परिषदेच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे नागरिक अक्षरशः संतप्त झाले आहेत. ही इमारत कोसळून जर जीवितहानी झाली, तर मुख्याधिकारी तथा डॉं. पंकज पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा साप्ताहिक खालापूर वादळचे संपादक खलील सुर्वे यांनी केली आहे.

बस्ती जळतेय, आणि बाबू मजेत :- खोपोली नगर परिषदेचे लोकसेवक लोकांच्या सेवेपेक्षा नेत्यांच्या सेवा करण्यात व्यस्त असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शहरात गटाराचे पाणी नळात मिसळतंय, रस्ते खड्ड्यांनी भरलेत, मच्छर–डासांचा त्रास असह्य झालाय, भटक्या कुत्र्यांचा आणि मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलाय, शाळा, शौचालये आणि सार्वजनिक ठिकाणांची दुर्दशा म्हणजे संपूर्ण शहर अराजकतेत आहे…अग्नि लागलीय बस्तीला, आणि बाबू मजेत आहेत, असा उपरोध नागरिकांनी व्यक्त केला.

शिळफाटा भाजी मार्केटची इमारत तब्बल 50 ते 60 वर्ष जुनी आहे. स्लॅबमधून लोखंडी सळया कुजल्या आहेत, काँक्रीटचे तुकडे कोसळत आहेत, आणि इमारतीतून जाणं म्हणजे जीवावर बेतणारं साहस…दिवसाढवळ्या नागरिक, दुकानदार आणि ग्राहक या इमारतीखाली जीव मुठीत धरून उभे असतात. आज नाही तर उद्या ही इमारत कोसळेल, असा अंदाज नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करते. मार्केटमध्ये घुसल्यानंतर नाकाला रुमाल लावावा लागतो, कारण दुर्गंधीचा सामना करणे म्हणजे नरकयातना भोगणे…अशी तिखट प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.

भाजी मार्केट की गुन्हेगारीचा अड्डा ? :- दिवाळीसारख्या सणात लोक खरेदीसाठी येतात, पण मार्केटमध्ये त्यांना मिळते दुर्गंधी, भीती आणि गुन्हेगारीचं वातावरण… या मार्केटमध्ये चरस, अफीम, गांजा, दारू पिणाऱ्यांचा आणि जुगार खेळणाऱ्यांचा उच्छाद माजला आहे. रात्र झाली की हा परिसर “मुक्त गुन्हेगारी क्षेत्र” बनतो, आणि पोलिसही याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा नागरिकांचा आरोप आहे.

कुंभकर्णी झोपेत नगर परिषद :- भाजी मार्केटच्या धोकादायक अवस्थेबाबत अनेक वेळा वृत्तपत्रांत बातम्या प्रसिद्ध झाल्या, आम आदमी पार्टीने आंदोलन करून निवेदन दिले, पण नगर परिषद मात्र कुंभकर्णी झोपेतच आहे. मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील हे लोकप्रतिनिधींच्या फाईली आणि खासदार, आमदारांच्या फोनमध्ये व्यस्त असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मुख्याधिकारी नगरपालिकेचे काम न करता नेत्यांची सेवा करण्यात मग्न आहेत. त्यांना खोपोलीकरांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही, अशी टीका पत्रकार आणि नागरिकांनी केली आहे.

या मार्केट परिसरात 13 मार्च 2011 रोजी बेलदार (ओड) समाजासाठी समाजमंदिर बांधण्यात आले होते. अनेक मान्यवर, माजी आमदार आणि नगराध्यक्षांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले होते. पण आज ही इमारत धुळीत मिळाली आहे. त्या जागेवर दारू पिणारे आणि जुगारी दिवसरात्रं वावरत आहेत. नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे हा समाजमंदिर दारूच्या ठिकाणात बदलला आहे, असा आरोप नागरिकांनी केला.

मुख्याधिकारी नेहमी अनुपस्थित – नागरिक त्रस्त :- नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना भेटणे म्हणजे पर्वत पेलण्यासारखे झाले आहे. नागरिक, पत्रकार, आणि लोकप्रतिनिधी तासन्तास थांबूनही भेटू शकत नाहीत. मुख्याधिकारी कायम अनुपस्थित आणि भेट दिली तरी माहिती देण्यास टाळाटाळ, अशी टीका पत्रकार संघटनांकडून करण्यात आली आहे.

खोपोली नगर परिषद ही लोकसेवकांच्या नव्हे तर “लोक विसरकांच्या” ताब्यात गेली आहे. भाजी मार्केटसारख्या ठिकाणी नागरिकांचा जीव धोक्यात असताना अधिकारी मात्र मूकदर्शक आहेत. बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई, पण भाजी मार्केट वाचवणाऱ्यांकडे दुर्लक्ष, हीच नगर परिषदेची आजची शोकांतिका आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी केलीच पाहिजे कारण लोकांचे प्राण खेळ नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!