खोपोली नगरपरिषदेतील निष्काळजीपणाचा कळस — नागरी सुविधा केंद्रातूनही अर्ज गायब!
शिवाजी जाधव यांच्या नादेय दाखला अर्जाचा दोन दिवस शोध घेऊनही ठावठिकाणा नाही

खोपोली, (बेधडक महाराष्ट्र) — खोपोली नगरपरिषदेतील नागरी सुविधा केंद्रातून नागरिकांच्या अर्जांचे गायब होण्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. स्थानिक नागरिक श्री. शिवाजी जानु जाधव यांनी दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी नगरपरिषदेत मालमत्ता क्र. KHP-000102158 संदर्भात ‘नादेय दाखला’ मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी दोन दिवसांपासून नागरी सुविधा केंद्रात व कर विभागात वारंवार विचारपूस केली. मात्र, सर्व दस्तऐवज तपासूनही संबंधित अर्जाचा ठावठिकाणा सापडलेला नाही, असे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कबूल केले आहे.
या निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. “नगरपरिषदेत अर्जच गायब होत असतील तर नागरिकांच्या हक्कांची हमी कोण घेणार?” असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. अर्जदार शिवाजी जाधव यांनी याबाबत मुख्याधिकारी साहेबांकडे लेखी तक्रार दाखल करून चौकशीची मागणी करणार आहे.
सामान्य नागरिकांच्या अर्जांची अशी दुर्दशा होत असताना, नगरपरिषदेतील रेकॉर्ड व्यवस्थापन प्रणाली आणि जबाबदारी ठरविण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.