खोपोली नगरपरिषदेच्या आरक्षण सोडतीवर दाखल हरकतीसाठी किशोर साळुंके यांना जिल्हाधिकारी कार्यालयाची सुनावणी नोटीस.

खोपोली (प्रतिनिधी):
खोपोली नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण आणि सोडतीच्या कार्यक्रमावर दाखल झालेल्या हरकतीवर आता सुनावणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अनुषंगाने पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. किशोर साळुंके यांना रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता उपस्थित राहण्याची नोटीस देण्यात आली आहे.
महसूल व वन विभागांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांनी दिलेल्या आदेशानुसार, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्याविरोधात साळुंके यांनी १० ऑक्टोबर रोजी आपली हरकत व सूचना सादर केली होती.
या सुनावणीस जिल्हा प्रशासन अधिकारी विराज लबडे यांच्या स्वाक्षरीने नोटीस जारी करण्यात आली असून, सुनावणीच्या वेळी संबंधित व्यक्ती उपस्थित न राहिल्यास दाखल हरकत विचारात घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे.
खोपोलीतील नगरपरिषद आरक्षण प्रक्रियेत पारदर्शकता आणि स्थानिक जनतेच्या मतांचे प्रतिबिंब पडावे, यासाठी साळुंके यांनी दाखल केलेली हरकत लक्षवेधी ठरली आहे. या सुनावणीच्या निकालाकडे स्थानिक नागरिक व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.