Uncategorized

खोपोली खुनातील फरार आरोपी अखेर रायगड पोलिसांच्या ताब्यात! नेपाळ सीमेवरून पकड

“फरारी”चा शेवट – रायगड पोलिसांनी दाखवली तपास कौशल्याची ताकद!

खोपोली / प्रतिनिधी – बेधडक महाराष्ट्र

रायगड जिल्हा पोलिसांनी खोपोली येथील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला तब्बल १८ दिवसांच्या पाठलागानंतर भारत–नेपाळ सीमेवरून जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे रायगड पोलिसांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

११ सप्टेंबर २०२५ रोजी खोपोलीजवळील देवन्हावे गावात पारस हरिहर सिंग (वय ५०, रा. खैरवा, बिहार) या मजुराचा खून झाल्याची घटना घडली होती. त्याच्यासोबत राहणारा अख्तर हबीब बैठा (रा. मधुबनी, बिहार) हा त्याच्या शेजारीच पत्र्याच्या शेडमध्ये राहत होता. काही दिवसांपूर्वी पारस सिंग यांनी अख्तरला हातउसने ६,००० रुपये दिले होते. हे पैसे परत मागितल्याच्या रागातून अख्तरने दगडाने डोक्यावर वार करून पारस सिंगचा निर्घृण खून केला आणि घटनास्थळावरून पसार झाला.

खुनानंतर आरोपीचा मागोवा लागत नसल्याने तपास पथकासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय अधिकारी विशाल नेहुल आणि पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक तपास सुरू केला.

प्रथम आरोपी ठाणे, डहाणू, सुरत आणि अहमदाबाद येथे असल्याचा अंदाज आला. मात्र त्याने फोन बंद केल्यामुळे सर्व संपर्क तोडले गेले. तपासकर्मी बिहारमधील मधुबनी आणि सितामढी येथेही गेले, पण ठोस माहिती मिळाली नाही. तरीही पोलिसांनी हार न मानता स्थानिक गोपनीय सूत्रांचा जाळा उभा केला. शेवटी मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार आरोपी नेपाळमधील महोत्तरी जिल्ह्यातील एकदराबेला येथे लपून बसल्याचे उघड झाले.

या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने २९ सप्टेंबर रोजी भारत–नेपाळ सीमारेषेवर सापळा रचला. दीर्घ प्रयत्नांनंतर अख्तर हबीब बैठा याला अत्यंत शिताफीने अटक करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून सध्या तो न्यायालयीन आदेशानुसार पोलिस कोठडीत आहे.

या यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अभिजीत व्हरांबळे, पोहवा संदिप चव्हाण, पोशि प्रणित कळमकर, परसराम टेकाळे, किरण देवकाते आणि समीर पवार यांनी मोलाची भूमिका बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!