Uncategorized

चौल-आग्राव रस्ता: जनतेचा शाप, सत्ताधाऱ्यांची झोप!

ग्रामस्थांचा संताप उफाळला — “शासनाच्या उदासीनतेमुळे विकास नव्हे, विनाश पाहतो आहोत

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील चौल-आग्राव रस्ता हा आज गावकऱ्यांसाठी “खड्ड्यांचा मार्ग” ठरला आहे. राज्य सरकारच्या ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळून दहा महिने उलटले तरी कामाचा मागमूस नाही. परिणामी, चौल आणि आग्राव परिसरातील नागरिकांचा संयम सुटला असून ग्रामस्थांनी सत्ताधाऱ्यांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तीव्र रोष व्यक्त केला आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच हा रस्ता चिखल, खड्डे आणि पाणथळीत बदलला आहे. दुचाकी असो वा चारचाकी — प्रवास म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “सरकारने आमचं आयुष्य नरकासमान केलंय, रस्ता नव्हे तर खड्ड्यांचा महामार्ग तयार झालाय.”“मंजुरी झाली, आदेश निघाला, पण कामच नाही!” चौल ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अजित गुरव यांनी सांगितले,

“चौल-आग्राव रस्त्याचे काम ६ डिसेंबर २०२४ रोजी मंजूर झाले. कार्यारंभ आदेशही देण्यात आला. पण सहा महिन्यांनंतरही रस्त्याचे काम सुरू झाले नाही. आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला, निवेदने दिली, आंदोलने केली — पण सत्ताधाऱ्यांनी कानाडोळाच केला. हे काम जाणीवपूर्वक अडवले गेल्याचा आम्हाला संशय आहे.”

“राजकीय स्वार्थासाठी गावकऱ्यांना शिक्षा!”

ग्रामस्थांचा आरोप आहे की, सध्या सत्तेवर असलेल्या नेत्यांनी राजकीय मतभेदामुळे हे काम जाणीवपूर्वक रोखून धरले आहे.

ग्रामस्थांच्या भाषेत सांगायचं झालं तर —“विकासाचं आश्वासन देणारे नेते आता गायब झालेत. निवडणुकीत येतील तेव्हा रस्ता सोडून फुलांचा वर्षाव करतील, पण सध्या आम्ही खड्ड्यांत अडकलोय!” चौल परिसरात आता “खड्ड्यांचे फोटो” आणि “सत्ताधाऱ्यांचे बॅनर” सोशल मीडियावर ट्रेंड होत असून लोकांच्या रोषाची झळ राजकीय गोटांपर्यंत पोहोचली आहे.

व्यंगात्मक ‘आभार प्रदर्शन’.सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेविरोधात ग्रामस्थांनी व्यंगात्मक आभार प्रदर्शन केले. त्यांनी बॅनरवर लिहिले —

“राज्य सरकार आणि ग्रामसडक योजनेतील अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार! चौल-आग्राव रस्ता नसल्यामुळे आता आम्ही पायी चालण्याचे आरोग्य जपतो आहोत!”

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, शासनाचे अधिकारी व स्थानिक नेते यांनी केवळ निवडणुकीपूर्वीच रस दाखवला. कामाचे फोटो, शिलान्यास आणि घोषणा मात्र झाल्या; पण प्रत्यक्षात मातीचा एक ढिगारा हलवला नाही.

स्थानिक राजकारणाचा रंग. पूर्वी शिवसेना उ.बा.ठा पक्ष सत्तेवर होता, आता राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या आघाडीतील नेते एकमेकांवर दोषारोप करत आहेत. मात्र गावकऱ्यांच्या मते, “ज्यांच्या हातात सत्ता आहे, जबाबदारी त्यांचीच आहे!”

राजकीय गोटांमध्ये आरोपांच्या फैरी झडत असताना, चौलचा सर्वसामान्य नागरिक मात्र दररोज खड्ड्यांतूनच प्रवास करतो आहे. गावकऱ्यांचा उपरोध इतका तीव्र आहे की —

“चौलमध्ये विकासाच्या नावाखाली फक्त फलक बदलले; रस्ते मात्र तसेच राहिले,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांतून येत आहे.

चौलचा रस्ता — निवडणुकीचा हॉटस्पॉट.आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत चौल-आग्राव रस्ता हा प्रमुख विषय ठरणार हे निश्चित आहे. लोक विचारतात —

“कोण पैसा वाटतोय, कोण आश्वासन देतोय, यापेक्षा कोण रस्ता देतोय हे महत्त्वाचं!” ग्रामस्थांच्या दैनंदिन समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष हेच या संतापाचे मूळ आहे. एकंदरीत चौल-आग्राव रस्ता हा आता केवळ वाहतुकीचा नव्हे, तर सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेचा जिवंत पुरावा ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!