बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने मोर्बा येथे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारित परीक्षा संपन्न
बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड)

मोर्बा बौध्दजण सेवा संघ, महिला मंडळ स्थानिक व मुंबईकर यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षी वर्षावास कार्यक्रम दर गुरुवारी नियमितपणे सूर्यकांत केशव कासे धम्म प्रचारक तथा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क महाराष्ट्र राज्य सचिव यांच्या माध्यमातून सुरू आहे. धम्माच्या विविध अंगावर धम्म प्रवचनांमध्ये दाखले व उदाहरणे देऊन धम्म समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण केलेले प्रवचन कितपत समजत आहे याचे परीक्षण करण्यासाठी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र धम्म ग्रंथावर आधारित ५० प्रश्नांची एक समीक्षा प्रश्नावली तयार करून परीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. ही परीक्षा दोन गटांमध्ये घेण्यात आली. इयत्ता आठवी पर्यंतचा लहान गट व नववी ते बारावी किंवा पदवी पर्यंतचा दुसरा गट अशी परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी प्रश्नपत्रिका स्वतः कासे सरांनी तयार करून ती परीक्षार्थी पर्यंत पोचून अत्यंत निपक्षपातीपणे परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल दिनांक १२/ १० / २०२५ रोजी वर्षावास सांगता समारोपाच्या दिवशी करण्यात येणार आहे. दोन्ही गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय असे नंबर काढून त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. हा प्रयोग चांगला सफल झाला असून विद्यार्थी व लोकांमध्ये धम्मा बाबत जागृती निर्माण झाली आहे.कासे सरांच्या या धम्म कार्याचे तालुक्यातून सर्व स्तरातून कौतुक होत आहे.