Uncategorized

“बनावट नोटा प्रकरणातील” भूषण पतंगेचा रहस्यमय मृत्यू — पोलिसांवरच आरोप, न्यायालयीन चौकशीची मागणी

अलिबाग (रायगड) —अलिबाग शहराला हादरवून सोडणाऱ्या बनावट नोटा प्रकरणाने आज एक धक्कादायक कलाटणी घेतली आहे! या प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण विजय पतंगे (वय ३५, रा. मयेकर लाईन, अलिबाग) याचा मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून तो व्हेंटिलेटरवर होता. परंतु, त्याच्या मृत्यूनंतर आता शहरात तर्क-वितर्कांना उधाण आलं असून, “हा मृत्यू नाही, हा खून आहे!” असा थेट आरोप त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर केला आहे.

कुटुंबीयांचा संताप अनावर झाला आहे. “भूषणला चौकशीदरम्यान पोलिसांनी निर्दयीपणे मारहाण केली! त्यातूनच त्याचा मृत्यू झाला!” असा गंभीर आरोप त्यांनी केला असून, न्यायालयीन चौकशी व स्वतंत्र आयोग नेमण्याची मागणी त्यांनी केली आहे.

भूषणचा मृतदेह पाहिल्यानंतर काही नातेवाईकांनी ‘शरीरावर जखमांचे चिन्ह दिसत आहेत’ असा दावा करत प्रशासनालाही आव्हान दिले आहे.

३ ऑक्टोबरच्या रात्री अलिबाग पोलिसांना माहिती मिळाली की भूषण पतंगे बनावट भारतीय चलनी नोटा तयार करत आहे.

पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मयेकर वाडी येथे छापा टाकला आणि लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह मुद्रणासाठी लागणारे साहित्य जप्त केले.

या प्रकरणी गुन्हा क्र. १७७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १७८, १७९, १८०, १८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

कारवाई पोलीस अधीक्षक आंचल दलाल व उपविभागीय अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तपासाची सूत्रे पोलीस उपनिरीक्षक दीपक मोरे यांच्याकडे होती.

अटक झाल्यानंतर भूषण पतंगे न्यायालयीन कोठडीत असताना अचानक तब्येत बिघडल्याने त्याला अलिबाग जिल्हा रुग्णालयात, आणि पुढे मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले.

तेव्हापासून तो व्हेंटिलेटरवर होता. अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला, मात्र कुटुंबीयांनी त्यामागे थेट “पोलिसी छळ” असल्याचा आरोप केला आहे.पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले की, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.“तोपर्यंत कोणतेही अधिकृत निवेदन देता येणार नाही,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष आता या प्रकरणाकडे लागले आहे.भूषण पतंगेचा मृत्यू नैसर्गिक होता की चौकशीदरम्यान घडलेली अमानुष मारहाण यामागे होती — याचे उत्तर येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!